लोणंद : ‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, रामराजे नाईक-निंबाळकर आणि मकरंद पाटील यांनी लोणंद शहराची वाट लावली,’ अशा शब्दांत काँग्रेसप्रणीत आघाडीचे नेते बाळासाहेब बागवान यांनी संताप व्यक्त केला. ‘नगरपंचायत रद्द करण्यासाठी ठराव करणाऱ्या अन फाईल अडविणाऱ्यांना धडा शिकविणार,’ असा चंग बांधला आहे.लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील वातावरण तापून उन्हाळा आणखी तीव्र जाणवत आहे. अशा वातावरणात ‘लोकमत टीम’ने पॅनेलप्रमुखांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना बोलते केले. ‘अजितदादा एवढे मोठे राजकारणी असूनही लहानात लहान सोसायटीच्या राजकारणातही लक्ष घालतात,’ असे नमूद करतानाच ही तारीफ अधिक टीका असल्याचे बागवान यांनी स्पष्ट केले. ‘चोवीस तास पाणीयोजनेसाठी आम्ही पाठपुरावा करीत होतो तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. पाण्याचे मीटर नागरिकांना स्वखर्चाने घ्यावे लागू नयेत म्हणून मलकापूरप्रमाणे अनुदान मिळविण्याचा प्रयत्न होता. अनुदान नगरविकास खात्याकडून मिळत असल्याने नगरपंचायत स्थापन होणे गरजेचे होते. आम्ही सर्व खात्यांचे अभिप्राय घेऊन फाईल सादर केली. ग्रामपंचायत निवडणुकीला मोजके दिवस शिल्लक असताना ही फाईल मुद्दाम अडवून ठेवण्यात आली. तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवस फोनवरून आणि एकदा प्रत्यक्ष भेटून संवाद साधला; मात्र फाईल दाबून ठेवण्यात आली आणि आम्ही गाफिल असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आम्हाला वेळ कमी मिळाल्याने राष्ट्रवादीने निवडणूक जिंकली; पण साडेतीन वर्षे त्यांनी असा कारभार केला आहे की, जनताच त्यांना आता सत्तेवर येऊ देणार नाही,’ असे बागवान यांनी सांगितले.काँग्रेस आघाडीतील बहुसंख्य उमेदवार तिशीच्या आतले आहेत. पासष्ट वर्षांचे बाळासाहेब बागवान यांनी मात्र आजअखेर कधीच स्वत: ग्रामपंचायत लढविली नव्हती. १९९२ पूर्वी बापूसाहेब खरात आणि नानासाहेब भंडलकर यांनी केलेल्या समाजकारणाचा, राजकारणाचा वारसा ते सांगतात. या नेत्यांनी लोणंद कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याचा लाभ घेऊन ग्रामपंचायतीला जकातवसुलीची परवानगी मिळवून दिली आणि उत्पन्नवाढ करून अनेक सुधारणा केल्या. ४५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची इमारत उभारली आणि आठ किलोमीटरवरून नीरेचे पाणी आणले. १९९७, २००२ आणि २००७ च्या निवडणुकीत बागवान यांच्या पॅनेलला पूर्ण बहुमत मिळाले. यंदा त्यांच्यासमोर राष्ट्रवादी, भाजपबरोबरच काही अपक्षांचेही आव्हान असेल.अहिल्याबाई होळकर यांचे महाराष्ट्रातील दुसरे स्मारक आणि अद्ययावत स्मशानभूमी आपल्या कार्यकाळात साकारल्याचा ते अभिमान बाळगतात. चोवीस तास पाणीयोजनेचा दुसरा टप्पा मंजूर असतानाच सत्ता गमवावी लागल्याचे शल्य त्यांना टोचते. तंत्रसमृद्ध ही योजना राष्ट्रवादीमुळे रखडल्याबद्दल संताप व्यक्त करतानाच निवडणुकीत क्रमांक एकचा शत्रू राष्ट्रवादीच असल्याचे मानतात. (प्रतिनिधी)‘त्यांना’ गटात घेतले नाही...‘नगरपंचायतीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून चारजण फुटले. आम्ही त्यांना आमच्या गटात घ्यावे अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्यात विश्वासार्हता उरलेली नाही. पदाचा गैरवापर करून त्यांनी प्रतिमा गमावली आहे. त्यांचा अर्धा वेळ पोलिस ठाण्यातच खर्च होतो. त्यामुळेच त्यांना पॅनेलमध्ये घेण्यास आम्ही नकार दिला,’ असे बागवान यांनी नमूद केले.जाणाऱ्यांना जाऊ दिले...जाणाऱ्यांना जाऊ दिले...निवडणुकीच्या तोंडावर काही सोबतींनी बाळासाहेब बागवान यांची साथ सोडली आहे. त्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘माझ्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराला थारा नव्हता. कोणत्याही गोष्टीसाठी कुणाला पैसे द्यावे लागत नव्हते. यातून काही जणांच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाल्यानेच त्यांनी साथ सोडली. आम्ही शांतपणे त्यांना जाऊ दिले.’ंराष्ट्रवादीवर आरोपांच्या फैरीआम्ही पंधरा वर्षांत लोणंदमध्ये जी विकास कामे केली, त्यांचा राष्ट्रवादीने साडेतीन वर्षांत मुडदा पाडलाग्रामपंचायत जिंकल्यावर राष्ट्रवादीने पहिला ठराव केला तो नगरपंचायत रद्द करण्याचापाणीयोजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते बसविलेली कोनशिला राष्ट्रवादीने जेसीबी लावून उखडून टाकलीपाणीयोजनेसाठी आमच्या कार्यकाळात राखून ठेवलेल्या एक कोटी रुपयांची राष्ट्रवादीने झगमगाटासाठी उधळपट्टी केली
दादा, राजे, आबांनी लावली लोणंदची वाट!
By admin | Updated: April 6, 2016 00:21 IST