खटाव : कोरोनाचे वाढते प्रमाण तसेच कोरोनाबधितांची वाढती संख्या पाहता, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खटावमध्ये जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. परंतु विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसवण्यासाठी आता खटाव ग्रामपंचायत व दक्षता कमिटी मात्र रस्त्यावर उतरलेली दिसून येत आहे.
खटावमध्ये गावातील मुख्य रस्ते कळक बांधून येत्या ६ तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी दक्षता कमिटी सदस्य खडा पहारा देताना दिसून येत आहेत. त्यामुळे विनाकारण फिरून कोरोनाला निमंत्रण देणाऱ्यांवर लगाम बसवत असताना, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करतील अशा लोकांवर दंडात्मक कारवाईही करत आहेत. दक्षता कमिटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य मोक्याच्या ठिकाणी करडी नजर ठेवून आहेत.
होम क्वारंटाईन केलेले लोक पाच ते सात दिवसांत बाहेर पडून सुपर स्प्रेडर ठरत आहेत. होम क्वारंटाईन केलेले कोविड रुग्णही १४ ते १७ दिवस सामान्यांच्या संपर्कात येता कामा नयेत. कोविड पाॅझिटिव्ह रुग्ण हा १२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवू शकतो. असे लोक ‘मला काही लक्षणं नाहीत, मी आता बरा आहे, मला काहीच त्रास होत नाही. मला दम पण नाही लागत, माझं सॅच्युरेशनही नाॅर्मल आहे,’ अशी कारणे सांगत पाच ते सात दिवसांत घराच्या बाहेर पडून सुपर स्प्रेडरची भूमिका निभावत आहेत. याला लगाम बसवणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हे कडक पाऊल ग्रामपंचायतीच्यावतीने उचलले आहे. चौकामध्ये असलेल्या पहाऱ्यामुळे रस्ते सुनसान दिसत आहेत.
ज्यांच्या घरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्या घरातील इतर सदस्यांनी घराबाहेर पडू नये, बाहेर आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. आता तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखा व घरी बसा, असे आवाहनही सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी केले आहे.
०२खटाव०२
कॅप्शन :
खटावमध्ये ग्रामपंचायत व दक्षता कमिटीच्यावतीने विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे.