सांगली : सरकारविरोधी टीका देशद्रोही ठरविण्याचा राज्य शासनाचा फतवा म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार आहे. अशाप्रकारचे फतवे काढून कोणाचे तोंड दाबता येते का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. सरकार किंवा सरकारशी संबंधित असलेले लोकप्रतिनिधी यांच्याविषयीची टीका आता देशद्रोह मानण्यात येईल, असे परिपत्रक गृहविभागाने काढले आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, अशाप्रकारचे फतवे काढून हुकूमशाहीचा कारभार दर्शविला जात आहे. या गोष्टी चुकीच्या आहेत. सरकार दुष्काळाच्या बाबतीतही गंभीर नाही. दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी म्हणून आम्ही आता या प्रश्नावर अधिक आक्रमक होणार आहोत. त्यासाठी, मोर्चे, निदर्शने, रास्ता-रोको असे सर्व प्रकारचे मार्ग अवलंबिले जातील. शासनस्तरावरही दबाव टाकण्यासाठी शक्य तेवढ्या गोष्टी केल्या जातील. दुष्काळी जनतेला मदत मिळेपर्यंत आम्ही झगडत राहू. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे नियोजन झाले आहे. सरकारला दुष्काळी मदत देण्यास भाग पाडू. (प्रतिनिधी)
सरकारचा फतवा म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार
By admin | Updated: September 5, 2015 23:33 IST