सातारा : दूधाचे दर कमी झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर दूध ओतून दिले. येत्या आठ दिवसांत शासनाने निर्णय बदलला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.मनसेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी गायीचे दूध २३ रुपये तर म्हशीचे दूध ३२.६० रुपये असे होते. निवडणुकांच्या कालावधीत शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात केली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सत्तांतर घडवून आणले. परंतु नवीन आलेल्या शासनाने पहिला घाला हा शेतकऱ्यांवरच घातला. सध्या गायीचे दूध १८ रुपये तर म्हशीचे दूध ३२.१० रुपये असा दर घोषित करून शासनाने त्याला अनुमती दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येकडे वळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.’दूधाला योग्य दर न मिळाल्यास येत्या आठ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)दालनाऐवजी बाहेरजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात दूध ओतून देण्याची तयारी मनसैनिकांनी केली होती. मात्र जिल्हाधिकारी अश्विन मुदगल नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांना निवेदन दिले. त्यानंतर हे कार्यकर्ते दालनाबाहेर आले. याठिकाणी मनसे पक्षाशी संबंधित काही शेतकरी दूधाचा कॅन घेऊन उभे होते. हे कॅन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर ओतून देण्यात आले. त्यानंतर, शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्ते आवाराबाहेर पडले.
सरकारी पायऱ्या दुधानं माखल्या!
By admin | Updated: December 4, 2014 23:41 IST