सातारा : नोकरी-व्यवसाय सांभाळून समांतर नाटक करणं आता खूपच कमी झालं असलं, तरी तरुणांनी मनात आणलं तर सातारची हौशी रंगभूमी पुन्हा गतवैभव प्राप्त करू शकेल, हा आशावाद आहे ७३ वर्षांचे ‘तरुण’ रंगकर्मी शरद ऊर्फ नाना लिमये यांचा! मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं हा रंगकर्मी आपला प्रवास आजच्या तरुणांना सांगू पाहतोय. या प्रवासात अडथळे येतीलच; पण हिकमतीनं त्यावर मात करून कष्टानं उभ्या केलेल्या नाटकाचा शेवटचा पडदा पडतानाचा आनंद अनुभवाच, असं लिमये यांचं तरुणांना कळवळून सांगणं आहे. व्यावसायिक नाटकांचे प्रयोग महानगरांतच होत असल्याने त्यांचे विषयही महानगरी होत आहेत. अशा वेळी ‘आपलं’ नाटक आपण जिवंत ठेवायला पाहिजे, असं ते म्हणतात. तीस ते पस्तीस नाटकं आणि दहा-बारा एकांकिका करणाऱ्या नानांनी वयाच्या विसाव्या वर्षी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्यांचे मेहुणे भालचंद्र डांगे हेच त्यांचे गुरू होत. ‘नटराज संघ’ नावाची संस्था या मंडळींनी साताऱ्यात स्थापन केली होती, हे आज कुणाला माहीतही नसेल. नानांनी ‘प्रॉम्प्टिंग’पासून सुरुवात केली आणि मोठ्या कष्टानं अभिनयगुण लोकांसमोर आणले. बाळासाहेब वैश्ंपायन, काशिनाथपंत आपटे, सतीश आपटे आदींबरोबर त्यांनी काम केलं. अभिनव कलामंदिर, अद्वैत रंगभूमी या संस्थांमधून अनेक नाटकं उभी केली. या प्रवासात नानांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. हे अनुभव तरुणांपुढे मांडावेत, आम्हाला काय-काय करावं लागलं, हे तरुण रंगकर्मींनी जाणून घ्यावं, असं नानांना वाटलं आणि त्यांनी ते ‘फेसबुक’वर शेअर करायला सुरुवात केली. नानांना अगदी मर्यादित स्वरूपात ‘लाइक’ मिळत होते. अखेर त्यांचे मित्र डॉ. शैलेश फडके यांनी त्यांना हे अनुभव पुस्तकरूपानं मांडण्याची कल्पना सुचविली आणि नानांनी लगेच सुरुवात केली. (प्रतिनिधी) उद्या पुस्तक प्रकाशन शरद लिमये ऊर्फ नानांनी आपले अनुभव ‘माझे आपले काहीतरी’ या पुस्तकाद्वारे तरुण रंगकर्मींपुढे ठेवले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, दि. ६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. काळाबरोबर तंत्र बदललं म्हणून अभिनयासाठी लागणारे कष्ट कमी होत नाहीत. झटपट प्रसिद्धीसाठी दूरचित्रवाणी मालिकांकडे वळण्याऐवजी तरुण रंगकर्मींनी आपलं नाटक उभं करावं. निरीक्षण, अवलोकन, वाचन वाढवून अभिनयावर हुकूमत मिळवावी. - शरद लिमये, ज्येष्ठ रंगकर्मी
रंगभूमीवर कष्ट करण्याची नशा येऊ द्या!
By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST