महाबळेश्वर : राज्यातील ‘क’ वर्गमध्ये सर्वात श्रीमंत म्हणून लौकिक असलेल्या महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेस मार्चअखेर प्रवासी व प्रदूषणकर, पाणीपुरवठा, वेण्णा लेक बोट क्लब व मालमत्ता कर या चार प्रमुख विभागातून ९ कोटी २१ लाख ३८ हजार ७६१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पालिकेने मालमत्ता कराची ९१.८४ टक्के तर पाणीपुरवठा विभागाची ९०.८९ टक्के वसुली केल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. राज्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे. येथील विलोभनिय निसर्ग सौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडते. तिन्ही हंगामात येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. येथे दरवर्षी साधारण पंधरा लाख पर्यटक भेट देऊन सहलीचा आनंद लुटतात. सहलीसाठी आलेल्या पर्यटकांकडून पालिका प्रवासी कर तसेच त्यांच्या वाहनांचा प्रदूषण कर गोळा करते. हा कर गोळा करण्याचा ठेका खासगी संस्थेला देण्यात आला आहे. या करापासून पालिकेला दरवर्षी ३ कोटी २१ लाख रुपये मिळतात. प्रवासी कराचा वापर शहर व परिसरातील विकासकामे तसेच प्रदूषण कराचा वापर पर्यावरणपूरक गोष्टीसाठी तसेच स्वच्छता विभागासाठी करण्यात येतो.वेण्णा लेक येथे पर्यटकांसाठी नौकाविहाराची सोय केली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पालिकेने येथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटींची सोय केली आहे. या विभागातूनही पालिकेला उत्पन्न मिळते. यंदा या विभागातून पालिकेला २ कोटी ५२ लाख ५८ हजार ८२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या उत्पन्नातून पालिका वेण्णा लेक सुशोभीकरण तसेच पर्यटकांची सुरक्षेसाठी तसेच बोटींची खरेदी करते.मालमत्ता कर हा देखील पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन मानले जाते. या कराची देखील यंदा पालिकेने विक्रमी वसुली केली आहे. या विभागाने यंदा २ कोटी १४ लाख ७५ हजार १२१ रुपये अर्थात ९१.८४ टक्के वसुली करण्यात यश मिळविला आहे. या विभागाच्या वसुलीसाठी यंदा पालिकेने अधिकच कडक भूमिका घेतली होती. काही मिळकतधारक कर मूल्यांकनाचा विषय घेऊन न्यायालयात गेले होते. असे मिळकतधारक गेली अनेक वर्षे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याचे कारण सांगून कर भरत नव्हते. प्रकरण न्याय प्रविष्ठ असले तरी कर वसुलीला न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती. ही बाब यंदा मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केली व वसुलीसाठी वेळप्रसंगी मिळकती सील करण्याचीही भूमिका घेतल्याने अशा मिळकतींचीही वसुली करण्यात पालिकेला चांगलेच यश मिळाले आहे. या शिवाय कर वेळेत न भरल्याने दोन टक्के दंड आकारणीही पालिकेने सुरू केली होती. या सर्वांचा परिपाक म्हणून पालिकेने यंदा या विभागाची विक्रमी वसुली केली आहे. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा विभागाची सव्वा कोटींची वसुली...शहराला पालिका पाणीपुरवठा करते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेण्यात येते. पाणी खरेदी व विक्रीमध्ये मोठी तफावत असल्याने हा विभाग गेली अनेक वर्षे तोट्यात चालविला जात आहे. हा विभाग तोट्यात असला तरी या विभागानेही वसुली चांगली केली आहे. यंदा या विभागाने १ कोटी ३३ लाख ४ हजार ८१५ रुपये वसुली केली आहे. हा विभाग पालिकेने चालवावा का जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतर करावा, याबाबत दुमत आहे. तरीही या विभागाचा तोटा कमी करण्यासाठी पालिका कसोशीने प्रयत्न करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.
पालिकेस सव्वानऊ कोटींचे उत्पन्न
By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST