सातारा : कोरोनात महागाईच्याच झळा बसत असून, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागला. त्यामुळे आता ८६५ रुपये मोजावे लागणार आहेत, तर वर्षभरात जवळपास २६५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे जगायचे कसे हा प्रश्न असून, गृहिणींना चिंता गॅस पेटविण्याची आहे.
मागील सव्वा वर्षापासून कोरोना महामारीचं संकट आहे. यामुळे कामे बंद पडत आहेत. अनेकांचा रोजगार गेला. कोणाला कामावरून घरी बसावे लागले. अशातच गेल्या वर्षभरात इंधन तसेच गॅस सिलिंडरचे दर सतत वाढत आहेत. यामुळे महागाईची फोडणी अधिकच बसू लागली आहे. विशेषकरून सामान्य कुटुंबेही आज सिलिंडरवर अवलंबून आहेत. अशावेळी घरगुती सिलिंडरचे भाव सतत वाढत चालले आहेत.
काही दिवसांपूर्वी टाकीमागे २५ रुपयांची वाढ करण्यात आली, तर आता नुकतीच त्यामध्ये २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे ८६५ रुपयांपर्यंत सिलिंडर टाकी पोहोचली. साधारणपणे पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला एक सिलिंडर टाकी लागते. याचा हिशेब केला तर महिन्याला एका टाकीसाठी ८६५ रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनाच्या या काळात सामान्यांना हे परवडणारे नाही.
आठ महिन्यांत १६५ रुपयांची वाढ
महिना (दर रुपयात) - जानेवारी ६९९, फेब्रुवारी ७९९, मार्च ७९९, एप्रिल ८१४, मे ८१४, जून ८१४, जुलै ८३९, ऑगस्ट ८६५.
घरखर्च भागवायचा कसा?
कोरोना विषाणू संकटामुळे वर्षभरापासून कामे मिळविताना अडचणी येत आहेत. अनेकवेळा घरातच बसून राहण्याची वेळ घरातील पुरुष मंडळीवर आली आहे. त्यातच सिलिंडर टाकीचे दर वाढल्याने चूल पेटविण्याची वेळ आली आहे. - शांताबाई पवार, गृहिणी
मागील वर्षभरापासून महागाईचाच सामना करावा लागत आहे. कारण, भाज्या महागच आहेत; पण आता सिलिंडरचाही भाव वाढलाय. त्यामुळे अशीच वाढ होत राहिली तर जगायचे कसे, हा आमच्यापुढे प्रश्न आहे. - रुक्मिणी काळे, गृहिणी
डिसेंबरपासून सतत वाढ...
मागील एक वर्षाचा विचार करता घरगुती सिलिंडर टाकीचा दर ५९९ वरून ८६५ रुपयांवर पोहोचलाय. डिसेंबरमध्ये १०० रुपयांनी वाढ झाल्याने टाकी ६९९ वर गेली. त्याचबरोबर फेब्रुवारीत ७९९, एप्रिलमध्ये ८१४ तर जुलै महिन्यात ८३९ रुपये झाली होती.
शहरी भागात चुली बंद...
- शहरी भागात चुली बंद झाल्या आहेत. गॅसवरच सर्व स्वयंपाक होतो. त्यामुळे शहरवासीयांना सिलिंडरशिवाय पर्याय राहिलेला नाही.
- केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातही गॅस आणि सिलिंडर मिळाला. यामुळे गरिबांच्या घरीही शेगडी पेटली; पण आता सिलिंडरची किंमत सतत वाढत चालल्याने चूल पेटविण्याची वेळ आली आहे.
- सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबे ही आवश्यकता असेल तरच स्वयंपाकासाठी गॅस पेटवितात, नाहीतर चुलीवरच भाजी व भाकरी केली जाते.
व्यावसायिक सिलिंडरही महाग...
घरगुती तसेच व्यावसायिक सिलिंडरचे दर मागील काही महिन्यांपासून वाढत चालले आहेत. दरात कधी उतारही येत आहे. जानेवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडर टाकीचा दर १३४८ रुपये होता. फेब्रुवारीत १५३९ रुपये झाला, तर एप्रिलमध्ये १६४६ झाला होता. मात्र, त्यानंतर किंमत कमी झाली. जुलै महिन्यात १५६२ रुपये किंमत होती.
सबसिडी बंद; दरवाढ सुरूच...
घरगुती सिलिंडर टाकीवर मागील काही वर्षांत सबसिडी देण्यात येत होती. सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होत होती; पण वर्षभरपासून ही सबसिडी बंद करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे सिलिंडर टाकीचा दर वाढतच चालला आहे.