सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले असले तरी सातारा शहरात याचा फज्जा उडाला आहे. खरेदी करतेवेळी नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत.
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे नागरिकांवर बंधने आली होती. मात्र, आता शासनाने नियम शिथील केले आहेत तसेच किराणा दुकानांच्या वेळेतही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सातारा शहरात तर सोशल डिस्टन्सिगंचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या अनेक नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. काही नागरिक तर मास्क तोंडावर न ठेवता हनुवटीवर ठेवत असल्याचेही दिसून येते. यामुळे शासन नियमांना तिलांजली मिळत आहे.
......................................
वीजचोरांवर कारवाईची गरज
सातारा : माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून वीजचोरांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. घरासाठी वीजचोरी करणारे सायंकाळच्या सुमारास वीजतारांवर आकडे टाकतात. त्यानंतर रात्रभर वीज पुरवठा सुरू राहतो. अशा वीजचोरांवर कारवाईची गरज आहे.
.................................................
पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या काढताना व उभ्या करताना अडचणी निर्माण होत आहेत. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेसमोर दुचाकीसाठी पार्किंग आहे. याठिकाणी नोकरदार दुचाकी लावतात तसेच कामानिमित्त येणाऱ्यांच्या गाड्याही असतात. पण, अनेकवेळा पार्किंगमध्ये जागा उरत नाही. त्यावेळी नागरिक कशाही पध्दतीने दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे इतरांना गाडी बाहेर काढता येत नाही.
...................................................................
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. सातारा - पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरुन जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती. पण, महामार्गाच्या कामावेळी अनेक झाडे तोडण्यात आली. त्यामुळे सध्या या रस्त्याच्या बाजूला अपवादात्मकच झाडे दिसतात. पर्यावरण संतुलनासाठी या महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करुन संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.
....................................................
साताऱ्यात प्लास्टिक पिशवीतून फळे
सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरूवातीच्या काळात प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देत आहेत.
.........................................................
मेथीची पेंडी महागली
सातारा : सातारा शहरात पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मेथीची पेंडी तर २० रुपयांवर गेली आहे. सातारा बाजार समितीतून पालेभाज्यांची खरेदी करण्यात येते. त्यानंतर भाज्या मंडईत विक्रीसाठी ठेवण्यात येतात. सध्या मेथी तसेच कोथिंबीर पेंडीचा दर वाढला आहे. मेथी २० रुपये तर कोथिंबीर पेंडी १५ रुपयांपुढे मिळत आहे.
........................................
खड्डेमय रस्त्यातून प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्रीच्यावेळी तर वाहने या खड्ड्यांत आदळतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांनी डांबराने हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
.................................................
कोरोनामुळे आठवडा बाजार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील आठवडा बाजार बंद आहेत. माण तालुक्यातीलही बाजारही बंद आहेत.
...........................................
समर्थ मंदिर चौकात कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकात सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारकांबरोबरच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
सातारा नगरपालिका - बोगदा मार्गावर समर्थ मंदिर चौक आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, या चौकात अरुंद रस्ता आहे तसेच एस. टी. थांबाही आहे. काही वाहनेही पार्क करण्यात येतात. त्यामुळे सकाळी दहा आणि सायंकाळी सहाच्या सुमारास याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाहनधारकांचा बराच वेळ जातो. याठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.