फलटण : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वीजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. वीजप्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या फांद्या, झाडे पावसाळ्यापूर्वी तोडणे गरजेचे असूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणाचा फटका ग्राहकांना, कोरोनाबाधित रुग्णांना बसत आहे. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जाधववाडी (तामखडा) विद्युत सबस्टेशन येथून गोखळी आणि पंचक्रोशीत वीजपुरवठा केला जातो. गेल्या आठवड्यापासून या परिसरात रात्री-अपरात्री खंडित झालेला वीजपुरवठा रात्रभर बंदच राहतो. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता झाडाझुडपांच्या फांद्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण देऊन मोकळे होत आहेत.
पूर्व भागातील गोखळी, पवारवाडी, आसू, साठे येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना डासांचा उपद्रव होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आजारातून बाहेर पडण्याऐवजी जास्त आजारी होण्याचा धोका संभवतो. गतवर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये थकीत वीजबिले ग्राहकांनी १०० टक्के भरली आहेत. गोखळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पिण्याच्या पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
चौकट..
वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे...
गोखळी पाणीपुरवठा योजना गुणवरे हद्दीतून कॅनालशेजारी विहीर खोदकाम करून विद्युतपंप बसवून राबविण्यात आली. मात्र वीज कनेक्शन सिंगल फेज नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होतो. सिंगल फेज कनेक्शन डीपी बसविण्यात न आल्याने दोन वर्षांपासून काम रखडलेले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून यापुढे वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सिंगल फेज डीपी त्वरित बसविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.