सातारा : माकडांना खाऊ घालण्याची तुमची भूतदया आता तुमच्याच अंगलट येऊ शकते. वन विभागाने अशा बेजबाबदार कृत्याविरोधात कठोर पावले उचलली असून, आता थेट गुन्हा दाखल केला जात आहे. साताऱ्यातील यवतेश्वर घाटात माकडांना खाऊ घालणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा नोंदवून वन विभागाने कारवाईची झलक दाखविली आहे. त्यामुळे माकडांना खायला घालताना दहावेळा विचार करावा लागणार आहे.
माकडांना खाद्यपदार्थ देणे एक गंभीर धोकामाकडांना खायला घालण्याची सवय निसर्गाच्या विरुद्ध आहे, असे असताना अनेक दशकांपासून नागरिकांनी माकडांना खायला घालून त्यांना ऐतखाऊ बनवले आहे. यामुळे ही माकडे नैसर्गिक अन्न शोधण्याचे कौशल्य विसरू लागली आहेत. त्यांच्या पुढच्या पिढ्यादेखील ही कला विसरून अन्नासाठी केवळ माणसांवर अवलंबून राहत आहेत.
या कृतीमुळे होणारे दुष्परिणामनैसर्गिक वर्तनावर परिणाम : माकडांना मानवी खाद्यपदार्थ दिल्याने त्यांचे नैसर्गिक वर्तन बदलते. त्यांचे निसर्गातून अन्न गोळा करण्याचे कौशल्य नष्ट होते.मानवी वस्तीत वावर : मानवी वस्तीत खाद्यपदार्थ मिळण्याची सवय लागल्याने माकडे शहरांकडे आकर्षित होतात. यामुळे मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढतो.वाहतुकीत अडथळा : रस्त्याच्याकडेला माकडांना खाद्यपदार्थ टाकले जातात. हे पदार्थ खाण्यासाठी माकडे रस्त्यावर येतात, ज्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आणि अपघातांचा धोका वाढतो.
वन विभागाचा इशाराया गंभीर प्रकाराची दखल घेत वन विभागाने माकडांना खाऊ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे. पर्यावरणप्रेमींनी वन विभागाच्या या भूमिकेचे कौतुक केले असून, जिथे-जिथे माकडांना खाऊ घातले जाते त्या-त्या ठिकाणी ‘माकडांना खाऊ घालू नये’, असे सूचना फलक लावण्याची मागणी केली आहे, जेणेकरून जनतेमध्ये जागरूकता वाढेल.
भटक्या कुत्र्यांचं काय?वन विभागाने माकडांना खाऊ घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, सातारा शहर व उपनगरातील भटक्या कुत्र्यांची समस्या आजतागायत कधीही सुटलेली नाही. त्यामुळे भटकी कुत्री व त्यांचा उपद्रव लक्षात घेता पालिका व पोलिस प्रशासनाने याबाबत योग्य ती पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.