मायणी : मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव तब्बल पाच वर्षांनी वाहू लागला आहे. बुधवारी सकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, येथील फ्रेंडस ग्रुपने तलावाची गळती काढण्यासाठी अनमोल कार्य केल्यामुळे अनेकांनी ग्रुपला धन्यवाद दिले.खटाव तालुक्यातील मायणी व परिसरातील पवारमळा, शेडगेवाडी, चितळी, माहुली, चिखळहोळ (ता. खानापूर, जि. सांगली) आदी भागांतील शेती मायणी ब्रिटिशकालीन तलावावर अवलंबून आहे. सलग चार-पाच वर्षे परिसरामध्ये अल्प प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तलाव कोरडा राहत होता. परंतु यावर्षी कलेढोण, पाचवड, कानकात्रे परिसरामध्ये पुरेसा व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तलाव क्षेत्रातील सर्व लहान-मोठे तलाव, नालाबंडिंग, पाझर तलाव भरून वाहू लागले. त्यानंतर सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आजअखेर तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले.सामाजिक क्षेत्रातील फ्रेंडस ग्रुपने तलावात पाणी येण्याच्या दिवसापासून परीश्रम घेऊन दोन ठिकाणची गळती काढली. त्यामुळे आज (बुधवारी) हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. हा तलाव भरल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. फ्रेंडस् ग्रुपने केलेल्या कार्यामुळेच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आमदार अनिल बाबर, छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख, मायणी बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, हेमंत जाधव, हिंमत देशमुख, डॉ. मकरंद तोरो, प्रमोद महामुनी, रमजान इनामदार, रवींद्र बाबर, राहुल बाबर, प्रसाद कुंभार, मल्हारी साबळे, एन. व्ही. कुबेर, प्रमोद इनामदार, प्राचार्या सिंधू खाडे आदींनी या ग्रुपचे कौतुक केले. (वार्ताहर)
पाच वर्षांची प्रतीक्षा संपली--ब्रिटिशकालीन तलाव
By admin | Updated: November 12, 2014 23:32 IST