दिलीप पाडळे
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्याने थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पाचगणीतील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. विद्यमान नगरसेवक व इच्छुकांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून डावपेच आखायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमुळे येथील निवडणुकीला यंदा पक्षीय वलय आले आहे; परंतु निवडणूक पक्षांच्या चिन्हावर होणार, स्थानिक आघाड्या एकत्र येणार की अपक्ष उमेदवार यंदाही करिश्मा करणार, हे वाॅर्डरचना व आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे.
पाचगणी पालिकेची २०१६ रोजी झालेली निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी १ हजार ७६० इतक्या मताधिक्याने विजय साजरा केला होता. सध्या पाचगणी पालिकेत १७ सदस्य असून यामध्ये ९ महिला सदस्य, तर आठ पुरुष सदस्य आहेत. येथे पक्षीय राजकारणाला स्थान नाही. आजवर झालेल्या पालिका निवडणुकीत इच्छुकांनी अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणुका लढविल्या आहेत; तर निवडून आल्यानंतर सत्तेसाठी सोयीस्कररीत्या आघाड्यांचा घाट घातला जातो, हा आजवरचा इतिहास आहे.
पाचगणी पालिकेत पाच वर्षांच्या कालावधीत परिस्थिती नेहमीच दोलायमान राहिली आहे. कधी सत्ताधारी गटाने विरोधी सदस्य आपल्याकडे खेचून आपली बाजू भक्कम केली; तर कधी विरोधकांनी सत्ताधारी गटातील सदस्य फोडून हादरे देण्याचा प्रयत्न केला; परंतु मुरब्बी राजकारणी असलेल्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी अशाही परिस्थितीत कास्टिंग व्होटच्या आधारे नगरपरिषदेत बाजी मारली. त्यानंतर मात्र सत्ताधारी गटाची सदस्य संख्या फुटल्याने आता विषयावर एकमत होणे दुरापास्त झाले आहे.
यंदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द झाली असून, निवडणूक ‘एक वॉर्ड - एक सदस्य’ अशी होणार आहे. त्यामुळे १७ वॉर्डमधून १७ सदस्य निवडून येणार आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. वॉर्डरचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. असे असले तरी विद्यमान नगरसेवक व इच्छुकांनी आपल्या वॉर्डात आपली उमेदवारी कशी सक्षम ठेवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. या निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांच्या पुढे उभे ठाकणार की आघाड्या होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जोड..