दत्ता यादव / सातारा सातारा : ‘स्वच्छ आणि सुंदर सातारा’ होण्यासाठी पालिका प्रशासन विविध मार्ग अवलंबत असताना आता शहरातील अडगळीत असलेल्या चार ओढ्यांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच या ओढ्यांवर फिल्टर बसविण्यात येणार आहेत. भविष्यात हे ओढे एखाद्या धबधब्यासारखे दिसणार असून, ओढ्यांचा उपयोग कचरा टाकण्यासाठी न होता, पर्यावरण संतुलनासाठी व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. येत्या काही दिवसांत या कामाला सुरुवात होऊन असे अगळे-वेगळे ओढे सातारकरांना पाहायला मिळणार आहेत. एलईडी सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सातारा पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची संधी मिळाली आहे. ‘स्वच्छ आणि सुंदर सातारा,’ होण्यासाठी अनेक चांगल्या योजना आखल्या जात आहेत. साताऱ्यातील ओढ्यांची समस्या फार पूर्वीपासून बिकट आहे. पावसाळ्यात ओढे तुंबत असल्यामुळे काहीच्या घरात पाणी जाण्याचेही प्रकार घडत आहेत. शहराची भौगोलिक रचना पाहता मुख्य चार ओढ्यांचा प्रवाह शहरातून बाहेर जात आहे. अनेक घरे ओढ्यांच्या काठी वसली आहेत, तर काही घरे चक्क ओढ्यांवर वसविण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकदा नागरिक ओढ्यामध्ये कचरा टाकतात. परिणामी आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत होता. तसेच अस्वच्छेमुळे ओढ्याच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतींना हे मारक ठरत आहे. त्यामुळे सजीवांना फिल्टर केलेले पाणी तर मिळेलच; शिवाय नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवणार नाहीत.
अडगळीतील ओढ्यांवर आता फिल्टर !
By admin | Updated: August 6, 2015 00:40 IST