जिंती ता. फलटण येथील पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळूमाफियांनी जिवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली. याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या फलटण पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे फलटण येथे गुन्हा दाखल होऊ शकला नाही. अखेर जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील पत्रकार यांनी कडक भूमिका घेतल्याने वाळूमाफियांवर सातारा येथे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार प्रशांत रणवरे यांना दि. १९ रोजी वाळूमाफियाने जिवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्याबरोबरच धमकी देणाऱ्यावर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे रणवरे यांनी आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत सोशल माध्यमावर पोस्ट टाकून त्याला फलटणचे पोलीस जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. याबाबत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, संतोष भोगशेट्टी, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाचे तुषार तपासे, जिल्हा निमंत्रक सनी शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक सुजित आंबेकर, राहुल तपासे,ओंकार कदम, संतोष नलवडे, अमित वाघमारे, समाधान हेन्द्रे यांनी एकत्र येत तत्काळ दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांच्याशी चर्चा करत गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्याची भूमिका घेतली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार प्रशांत रणवरे यांना फोनवर संपर्क साधत घटनेची सविस्तर माहिती घेत सातारा येथे येऊन गुन्हा दाखल करा, अशी भूमिका घेतली.
यानंतर फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार यांनी प्रशांत रणवरे यांना बरोबर घेऊन सातारा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची भेट घेतली व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्याबाबत या घटनेच्या संदर्भात तक्रारींचा पाढा वाचला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत घटनेची माहिती घेतल्यानंतर सातारा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झिरो नंबरने पत्रकार प्रशांत रणवरे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत संशयिताला ताब्यात घेतले. त्यामुळे अखेर सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मागणीला न्याय मिळाला.