सातारा : सदरबझार परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे थैमान सुरू आहे. या परिसरातील जवळपास पन्नास ते साठ नागरिक सांधेदुखी, थकवा, ताप, थंडी अशा आजाराने त्रस्त असून, अनेकांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोनाची धास्ती वाढत असताना साथरोगांचा फैलाव वाढू लागल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत.
सदर बझार हा साताऱ्यातील सर्वात दाट लोकवस्तीचा झोपडपट्टी परिसर आहे. या झोपडपट्टीत सुमारे साडेचार हजार नागरिक वास्तव्य करतात. फेब्रुवारी महिन्यात सदर बझार, लक्ष्मी टेकडी येथे मोठ्या प्रमाणात डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. यानंतर हिवताप विभागाने या परिसराचा सर्व्हे करून डासांच्या अळ्या नष्ट केल्या. काही महिने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पावसाच्या तोंडावरच या परिसरात पुन्हा एकदा डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू, मलेरियासह, चिकनगुनियाच्या साथीने अनेक जण आजारी पडले आहेत. अनेक जण खासगी डॉक्टर्सकडून उपचार घेत आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग आणि दुसरीकडे या साथीच्या आजारांनी सदरबझारकर सध्या हैराण झाले आहेत.
या परिसरात डासांचे प्रमाण अधिक आहे. पालिकेकडून डासांची वाढ रोखण्यासाठी धूर व औषधफवारणी केली जात आहे. तसेच हिवताप विभागाच्या आरोग्य सेवकांकडूनही या भागात सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले आहे. बहुतांश नागरिकांमध्ये चिकनगुनियाची लक्षणे आढळली असून, हिवताप विभागाने त्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.
(चौकट)
कोरोना टेस्ट निगेटिव्ह
डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाची लक्षणे असलेले अनेक नागरिक कोरोनाची आरपीटीसीआर चाचणीदेखील करीत आहेत. मात्र, या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येत आहे. लक्ष्मी टेकडी व जवान हौसिंग सोसायटीतील सुमारे २० ते २५ घरांतील ७० नागरिकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. अंगदुखी, ताप, थंडी अशी लक्षणे असून ती कमी होत नसल्याने नागरिक भयभीत झालेत.
(चौकट)
नागरिकांनी ही घ्यावी काळजी
- घराशेजारील डबकी तत्काळ बुजविणे, गटारे वाहती ठेवावी.
- अनेक दिवस साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा करावा.
- आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा
- इमारतीवरील टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावी.
- दारे व खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणे.
- घरातील भंगार साहित्य, बाटल्या, टायर यांची विल्हेवाट लावावी.
- घरातील कुलर, फुलदाण्या स्वच्छ करून कोरड्या कराव्यात.
- दैनंदिन पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे.
- आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.
फोटो :