कोयनानगर : पाटण तालुक्यातील बागायती शेतीसाठी वरदान ठरलेली कोयनामाई आता नदीकाठच्या जमीनधारकांसाठी धोक्याची ठरू लागली आहे. आजवर शेकडो एकर जमीन महापुरात वाहून गेली असून, अजून किती जाईल, हे सांगता येत नाही. हीच जमीन वाचवण्यासाठी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी प्रशासानाकडे धाव घेतली आहे. मात्र, अजूनही यावर तोडगा निघताना दिसत नाही.
कोयनाकाठच्या लाल मातीतील शेतजमिनी पिकासाठी सुपीक असून, भुसभुशीत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्यात जमीन मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. नव्या उमेदीने शेतकरी मेहनत करून जमिनीत पीक करतोय. मात्र, पावसाळ्यानंतर पिकासह जमीनच वाहून गेल्याचे विदारक चित्र दरवर्षी पाहायला मिळत आहे.
कोयना नदीपात्र दहा- पंधरा वर्षांत दीडपट ते दुपटीने रुंद झाले आहे. पावसाळ्यात उपनद्या, ओढे, नाल्यातून वाहून आलेली माती, दगड, गोटे नदीपात्रात साठून राहत आहेत. त्यामुळे नदीपात्रात भराव साचून नदीपात्र उथळ झाले आहे. काही ठिकाणी बेटसदृश स्थिती तयार झाली आहे. अनेक खोल डोहही नामशेष होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी पूर्वीपेक्षा लवकर पात्राबाहेर पडत आहे, तर उंच व अरुंद भागातील तीस- तीस फुटांच्या मातीच्या दरडी पाण्याबरोबर वाहून गेल्याने नदीच्या प्रवाहाची दिशा बदलून गेली आहे.
याबाबत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नदीपात्रात साठलेला माती, दगडांचा भराव बाहेर काढून रुंद व खोल चर काढून नदीचा प्रवाह मध्यभागातून प्रवाहित करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत नेरळे, ता. पाटण येथील शेतकऱ्यांनी महसूल विभागाला निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे यंदाही जमीन वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- कोट
नेरळे पुलाच्या पूर्व व पश्चिमेला नदीपात्र गाळाने भरले आहे. अनेक ठिकाणी गाळामुळे बेटे तयार झाली असून, नदीने प्रवाह बदलला आहे. यामुळे दरवर्षी शेती वाहून जात आहे, तसेच पुलाखालील भाग गाळाने भरल्यामुळे पावसाळ्यात लवकर हाच पूल पाण्याखाली जात आहे.
-जयवंत बोर्गे, नेरळे
- चौकट
पात्र उथळ; परिस्थिती अवघड
१) नदीकाठची शेती बेभरवशी बनली.
२) पात्र उथळ व पसरट झाल्याने धोका.
३) प्रवाह बदलला की शेती पंपाच्या फुटवाॅल्व्हची जागा बदलावी लागते.
४) प्रवाहापासून चर खणून पाणी फुटवाॅल्व्हजवळ आणावे लागते.
५) नदीकाठची झाडे वाहून गेल्याने जमिनीची धूप झाली.
६) काही गावांत नदीचे काठ वाहून गेल्याने पाणवठ्यावर नदीपात्रात उतरणे अवघड.
- कोट
नदीपात्रात उत्खननावर पूर्ण बंदी आहे. त्याठिकाणी वाळू असू शकते आणि वाळू लिलाव न झाल्याने त्या वाळूचा गैरवापर होऊ शकतो.
-योगेश टोम्पे,
तहसीलदार, पाटण
फोटो :
कॅप्शन : नेरळे, ता. पाटण येथे पुलाच्या जवळ कोयना नदीचे पात्र रुंद झाले असून, अनेक ठिकाणी गाळाने पात्र विभागले आहे.