कऱ्हाड : ‘सध्याच्या शासनाची विस्तारवाढीसंदर्भातील भूमिका स्पष्ट होत नसल्याने त्यांच्याकडून नक्की विमानतळ विस्तारवाढ केली जाणार आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. सरकार जर विमानतळ विस्तारवाढ करणार असेल, तर त्यासंदर्भात त्यांनी तत्काळ जमिनीचा दर स्पष्ट करावा, तसेच विमानतळ विस्तारवाढीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे प्रतिपादन कऱ्हाड विमानतळ विस्तावरवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले.कऱ्हाड येथे सोमवारी कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, सचिव अॅड. शिवाजी पाटील, अॅड. प्रकाश चव्हाण, शिवाजी धुमाळ, भास्करराव धुमाळ, जगन्नाथ पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र शिंदे, जनार्दन पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी किशोर पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारुंजी, केसे, मुंढे, विजयनगर या गावांतील विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रांताधिकारी यांच्याशी विमानतळ विस्तारवाढसंदर्भातील शासनाची नेमकी कोणती भूमिका आहे. जमिनीच्या दराबाबत शासन केव्हा निर्णय घेणार आदीविषयी विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी चर्चा केली. विमानतळ विस्तारीकरण, जमिनीचे दर, अशा विषयावर विस्तारवाढ बाधित समितीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी समितीतर्फे दिलेल्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनाने कऱ्हाड विमानतळ हद्दवाढप्रक्रिया सुरू केलेली आहे. शासनाकडून विस्तारवाढीची मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. विस्तारवाढीसंदर्भात संघटनेने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी जमिनीस प्रतिगुंठा तीन लाख पन्नास हजार रुपये अशी दराविषयी चर्चा झाली होती. त्याप्रमाणे विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी प्रतिगुंठा दहा लाखांप्रमाणे विमानतळ विस्तारवाढ करण्यासाठीची मागणी केली होती. मात्र, तो प्रश्न प्रलंबित राहिला. (प्रतिनिधी) अन्यथा आत्मदहन करू...सध्या सरकारच बदलले असल्याने विमानतळ विस्तारवाढीबाबत शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाली आहे. शासनाकडून देखील योग्य निर्णय घेतला जात नसल्याने त्यांच्या धोरणासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ आहेत. तरी शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा शेतकऱ्यांना आत्मदहन अथवा आठ दिवसांत उपोषण या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
विमानतळ विस्तारवाढीसंदर्भात भूमिका स्पष्ट करा
By admin | Updated: May 19, 2015 00:32 IST