कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयात इंग्रजी विषयाची ‘इंग्रजी भाषिक कौशल्य विकास’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी मार्गदर्शन केले. संभाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. अश्विनीताई तातुगडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेत विद्यार्थी सहभागी झाले होते.
रानडुकरांचा धुमाकूळ
कुसूर : विंग (ता. कऱ्हाड) येथे पिकांना आता रानडुकरांनी लक्ष केले आहे. विशेषत: येथील डोंगरपायथा परिसरात उभ्या पिकात कळपा-कळपाने त्यांचा धुडगूस सुरू आहे. रातोरात पिके फस्त होऊ लागली आहेत. तोंडचा घास हिरावून नेल्यासारखी स्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे.
डांबरीकरण पूर्ण
मल्हारपेठ : मारुल हवेली (ता. पाटण) येथील बाजारपेठेत मैदानाचे खडीकरण व डांबरीकरण असे काम नुकतेच पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. परिसर आकर्षक दिसत असून, गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजार मैदानाचे डांबरीकरण करण्यासाठी पंधरा लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यातून हे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
अस्ताव्यस्त पार्किंग
रामापूर : पाटण येथील तहसील कार्यालयात दुचाकीची पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे. तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी अस्ताव्यस्त लावल्या जातात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील पार्किंगबाबत कोणीही उपाययोजना करीत नाही.