तानाजी कचरे -- बावधन -संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या बावधन, ता. वाई येथील बगाड यात्रा होळी पौर्णिमेपासून (दि. २३) सुरू होत आहे. गेली काही वर्षे कर्नाटकातूनही भाविक या यात्रेला येतात. यात्रेपूर्वी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला एसटी बसस्थानक परिसर पूर्णत: स्वच्छ व्हावा, यासाठी ग्रामस्थ व परिसरातील मंडळींचा दबाव वाढत आहे. यात्रेच्या मीटिंगमध्येही याचे पडसाद उमटले. यात्रेपूर्वी हा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परिवहन खात्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेता एसटी प्रशासनाने तत्परतेने बसस्थानक परिसर मोकळा करावा, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. मात्र एसटी प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. गावच्या आरोग्याबरोबरच हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे. यामुळे एसटी प्रशासन काय भूमिका घेते यावर अवलंबून आहे. यात्रेपूर्वी काहीच हालचाल न झाल्यास तरुणाईचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत एसटी प्रशासन ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत गावात एसटी येऊ द्यायची नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे आंदोलन होऊ नये आणि सुसंवादाने हा प्रश्न मार्गी लावावा, असेही प्रयत्न होत आहेत. एसटी प्रशासनाने याकडे काणाडोळा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहणार आहे. एसटी प्रशासनाची उदासीनता आणि ग्रामस्थांची आग्रही मागणी याचा मेळ बसणार का? ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी सुसज्ज बसस्थानकासाठी निधीच्या मन:स्थितीत असतानाही प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास यात्रेपूर्वी लोक आंदोलनातून हा परिसर ‘साफ’ झाल्यास आश्चर्य वाटू नये. (समाप्त)बसस्थानकाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे ठराव परिवहन खात्याकडे देऊन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व एसटी प्रशासनाने लक्ष घालावे; अन्यथा लोकांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अरुणादेवी पिसाळ, माजी जि. प. अध्यक्षा.एसटी प्रशासन याकडे काणाडोळा करत आहे. परिवहन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र जनआंदोलन होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण ? यात्रेच्या अगोदर हा परिसर स्वच्छ व्हावा. बगाड यात्रेला बावधन गावात राज्यातून लाखो भाविक येत असतात. त्यासाठी स्वच्छता गरजेचे आहे.- सतीश पिसाळ, बावधन सरपंच
बावधनकरांच्या सहनशीलतेचा अंत !
By admin | Updated: March 16, 2016 23:48 IST