सातारा : तुंबलेली गटारे, फुटलेल्या पाईपलाईन, साचलेली डबकी, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी यामुळे साथीच्या आजारांचे पेव फुटले आहे. गावोगावी अस्वच्छतेची साथ आलेली पाहायला मिळत आहे. खटाव तालुक्यातील मायणी आणि जावळी तालुक्यातील सोमर्डी येथे दुर्गंधी, डासांचे साम्राज्य निर्माण झाले असून आरोग्य विभागाने याकडे गांभीर्यान लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.सोमर्डी ग्रामीण रुग्णालयाशेजारी साचली पाण्याची डबकीकुडाळ : जावळी तालुक्यातील सोमर्डी ग्रामीण रुग्णालय परिसरात असलेली ड्रेनेजची पाईप फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर रुग्णालयाशेजारीच मोठे डबके साचले असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे रुग्नांना त्रास सहन करावा लागत आहे.शनिवारी जावळी पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी, सदस्य मोहन शिंदे, भाजपचे रवी परामणे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. सुहास गिरी यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णालयातील स्वच्छता राखण्याचे आदेश दिले तर रुग्णालयाबाहेर साचलेल्या डबक्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असून डबके मुजविण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देणार असल्याचे गिरी यांनी सांगितले. (वार्ताहर)मायणीत सांडपाणी रस्त्यावरमायणी : येथील चांदणी चौक, फुलेनगर, चावडी चौक येथे असलेल्या गटाराचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. चांदणी चौकात मुख्य गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे तयार होऊन त्यात पाणी साठून राहत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. फुलेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गावातून येणाऱ्या पाण्याची पाईप बंद झाल्याने गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या घाण पाण्यातूनच परिसरातील रहिवासी ये-जा करत असतात. तसेच चावडी चौकात पिण्याच्या पाण्याच्या जॅकवेलला गळती लागल्यामुळे त्याचे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून सांडपाणी वाहून जाण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी होत आहे.
संपता संपेना अस्वच्छतेची साथ!
By admin | Updated: December 9, 2014 23:18 IST