काशीळ : पालच्या खंडोबा यात्रेत शनिवारी मानाचा ‘रामप्रसाद’ हत्ती बिथरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका महिला भाविकाचा चेंगरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले. अंजना नामदेव कांबळे (वय ६५, रा. लेबर चाळ, कदमवाडी, कोल्हापूर) असे या मृत, तर शेवंताबाई पांडुरंग जाधव (रा. भिलारेवाडी, पो. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) असे जखमी महिलेचे नाव आहे. पालच्या खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतून दरवर्षी जवळपास सहा ते सात लाख भाविक उपस्थित राहतात. शनिवारी मुख्यदिनी खंडोबा-म्हाळसा यांचा विवाह होणार असल्यामुळे भाविकांनी येथे पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. परंपरेनुसार मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून दुपारी दोन वाजता ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या गजरात मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक तारळी नदीपात्रात आली. पुन्हा एकदा ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या गजर झाला. वऱ्हाडी भाविकांनी हत्तीवर भंडारा खोबऱ्याची उधळण सुरू केली. मिरवणूक थोडी पुढे आली आणि याचवेळी गर्दीतील एका भाविकाने हत्तीच्या अंगावर मेंढीची लोकर उधळली. लोकरीचे केस हत्तीच्या डोळ्यात गेल्याने हत्ती बिथरला. एवढ्यात नदीपात्रातील खड्ड्यात त्याचा पाय गेला. हत्तीचा तोल गेल्यामुळे हत्तीवर बसलेले देवराज पाटील आणि समवेत असणारे एकजण खाली पडले. यामुळे गोंधळलेल्या भाविकांमध्ये धावपळ सुरू झाली. यामध्ये महिला भाविक अंजना नामदेव कांबळे या चेंगरल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ घटनास्थळावरून शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. हत्ती बदलून खंडोबा-म्हाळसा विवाह मानकरी देवराज पाटील हत्तीवरून खाली पडल्याची माहिती पसरल्याने गोंधळ सुरू झाला. भाविक सैरावैरा धावू लागले. त्यामुळे नेमके काय झाले, याची कोणालाच कल्पना येत नव्हती. पंधरा ते वीस मिनिटे हा गोंधळ सुरू होता. यानंतर मानकऱ्यांनी हत्तीच्या आजूबाजूची गर्दी बाजूला सारत हत्तीला शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले. यानंतर हत्ती शांत झाला. दरम्यान, याचवेळी नदीपात्रात असणारा औंधचा ‘मोती’ नावाचा हत्ती मिरवणुकीत सहभागी करून खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळ्याची सांगता झाली. दीड लाखाची मदतपालच्या खंडोबा यात्रेत हत्ती बिथरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर येथील अंजना नामदेव कांबळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत अंजना कांबळे यांना पाल येथील श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष देवराज पाटील यांनी दीड लाखाची मदत देणार असल्याची घोषणा रात्री उशिरा केली. (वार्ताहर)
पाल यात्रेत हत्ती बिथरला
By admin | Updated: January 4, 2015 00:50 IST