कऱ्हाड : शिवनगर (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. गुरुवार (दि. २१) ते सोमवार (दि. २५ मे) दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २१ जूनला मतदान, तर २३ जूनला मतमोजणी होणार आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. प्रतीक्षा होती ती फक्त निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची. ती प्रतीक्षा सोमवारी संपली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर भोसले यांनी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी माध्यमांच्या हातात दिला. ४६ हजार २९६ सभासद असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. २१ संचालक या निवडणुकीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांसाठी कारखान्याचा कारभार पाहण्यासाठीनिवडण्यात येणार आहेत. कारखान्याच्या सत्तेसाठी विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलच्या विरोधात माजी अध्यक्ष मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांनी रयत पॅनेल रिंगणात उतरविण्याचा चंग बांधला आहे. तर माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली यावेळी सहकार पॅनेलही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक तिरंगी होईल, असे चित्र आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी जिल्हाधिकारी संजीव देशमुख काम पाहणार आहेत. तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सुधाकर भोसले कार्यरत राहणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती कऱ्हाडचे सभागृह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय म्हणून निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल
By admin | Updated: May 19, 2015 00:20 IST