कऱ्हाड : कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या न्याय व हक्कासाठी मी कारखान्याच्या निवडणुकीत उतरलो आहे. यशवंतराव मोहिते व पतंगराव कदम या गुरू व शिष्याचे नाते सर्वांना माहिती आहे. यशवंतराव मोहिते यांचे विचार कुठेतरी डावलले जात असल्याची लोकभावना ऐकल्यानंतर मी त्यांचे विचार पुन्हा कारखान्यात रुजवण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहे. सत्ताधारी मंडळींवर लोकांची तीव्र नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांचे ऊसतोडीचे राजकारण, मयत सभासदांच्या वारसांना डावलण्याची भूमिका सभासदांना पसंत नाही. त्यामुळे सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे मत राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचारार्थ मालखेड, बेलवडे बुद्रुक व कालवडे (ता. कराड) येथील दौऱ्यात ते बोलत होते. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जखीणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र नांगरे पाटील, उमेदवार मनोहर थोरात, गणेश पाटील, प्रशांत पाटील, बापूसाहेब पाटील, शंकरराव रणदिवे, मालखेडचे सरपंच इंद्रजित ठोंबरे, उपसरपंच युवराज पवार, बेलवडे बुद्रुकचे भारत मोहिते, विकास मोहिते, कालवडेचे सरपंच सुदाम मोटे, बाबूराव मोटे, संताजी थोरात, भानुदास थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री कदम म्हणाले, यशवंतराव मोहिते यांनी कृष्णाकाठी सहकारास जन्म दिला. शेती ही जात व शेतकरी हा धर्म मानून कृष्णाकाठी त्यांनी नंदनवन फुलवले. एकेकाळी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कराड तालुक्यातील अर्थकारण चालायचे. परंतु गेल्या दहा वर्षात ही आर्थिक घडी विस्कटली आहे. यशवंतराव मोहिते यांच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या विचारांशी फारकत घेतली. हे मान्य करता येईल. परंतु दुसऱ्या काही शक्तींनी यशवंतराव मोहिते यांचा विचार संपवला. हे चित्र बदलले पाहिजे. सभासदांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे. यासाठी रयत पॅनेलच्या प्रचारात मी उतरलो आहे.
गेल्या दहा वर्षात पक्ष आणि व्यक्ती बघून कृष्णा कारखान्यात कारभार झाला आहे. त्यातून सभासदांना ऊसतोड न देणे, मयत सभासदांच्या वारसांना शेअर्स देताना दुजाभाव केला जात आहे. गेल्या पाच वर्षात ८ हजार सभासदांना सभासदत्व देण्यापासून डावलले गेले. यामागे सत्ताधारी मंडळींचा वेगळा डाव आहे. यशवंतराव मोहिते यांचे विचार पुन्हा कारखान्यात आणण्याची लढाई लढायची आहे. ती जिंकायची आहे, त्यासाठी सज्ज रहा, असेही ते शेवटी म्हणाले.
गीतांजली थोरात यांनी प्रास्ताविक केले. बी. वाय. थोरात यांनी आभार मानले.
फोटो
कालवडे ता. कराड येथील प्रचार बैठकीत बोलताना मंत्री विश्वजित कदम, बाजूस उमेदवार व पदाधिकारी.