आठ तासांनंतर थांबली घारीची जीवघेणी फडफड, नारळाच्या झाडावर मांज्यात अडकले होते पंख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 08:07 PM2018-03-25T20:07:24+5:302018-03-25T20:07:24+5:30
पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यात अडकून आजपर्यंत अनेक पशुपक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, साता-यात नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका घारीला जीवदान मिळाले.
सातारा : पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यात अडकून आजपर्यंत अनेक पशुपक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, साता-यात
नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका घारीला जीवदान मिळाले. गुरुवार पेठेतील एका नारळाच्या झाडावर मांज्यात अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका करण्यात आली अन् आठ तासांपासून सुरू असलेली घारीची जीवघेणी फडफडही थांबली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार बागेजवळ एका घराशेजारी नारळाचे झाड आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या झाडावर एक घार पतंगांच्या नायलॉन धाग्यात अडकली. पंख धाग्यात गुंतल्याने प्रयत्न करूनही तिला उडता येत नव्हते. घारीची सुरू असलेली फडफड येणा-या-जाणा-या नागरिकांच्या नजरेस पडली. काही नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती या ठिकाणी राहणा-या अरबाज शेख यांना दिली. यानंतर सर्वांचे घारीला वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. अरबाज शेख यांनी प्रारंभी नारळाच्या झाडावर चढणा-या काही व्यक्तींशी संपर्क साधला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही. यानंतर त्यांनी घटनेची माहिती वनविभागास दिली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. तोपर्यंत घार झाडावरच अडकून होती. वनविभागाच्या कर्मचा-यांनी युवकांशी संपर्क साधला. यानंतर काही युवक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी सहा वाजता त्या युवकांनी झाडावर चढून मांज्यात अडकलेल्या घारीची सुटका केली आणि आठ तासांपासून सुरू असलेली घारीची जीवघेणी फडफडही थांबली. वनअधिकारी व कर्मचा-यांसह अरबाज शेख, नीलेश राजपूत, संजय ताटे, चैतन्य ताटे, जुनेद बागवान, मुन्ना बागवान यांनी घारीची पाहणी केली. घारीला
कुठेही जखमा झाल्या नव्हत्या. खाद्य व पाणी न मिळाल्याने ती अशक्त झाली होती. नागरिकांनी तातडीने या घारीला पाणी पाजले. यानंतर घार पक्षीमित्रांच्या ताब्यात देण्यात आली. नंतर या घारीला तिच्या अधिवासात सोडण्यात आले.