कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेचा रखडलेला अर्थसंकल्प हा नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मागितलेला अहवाल वेळेत न दिल्याने रखडला गेला. आम्ही उपसूचनेद्वारे मांडलेला २७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर झाला. तो आमचा नैतिक विजय आहे. तरीही आम्ही टीकाटिप्पण्णी करीत बसलो नाही. नगराध्यक्षा शिंदेच पत्रकार परिषद घेऊन टीका करीत आहेत. त्यांचा अहंकार व वृत्ती शहराच्या विकासाच्या आड येत असल्याचा आरोप जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी केला.
नगरपालिकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र यादव बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती हणमंत पवार, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेविका प्रियांका यादव, ओंकार मुळे, निशिकांत ढेकळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राजेंद्र यादव म्हणाले, ‘खरं तर आम्ही विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केल्याने, गावाचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे आम्हाला उत्तर देणे क्रमप्राप्त बनले म्हणूनच आज पत्रकार परिषद घेऊन आमची बाजू मांडत आहोत.’
वास्तविक कोणतीही करवाढ न करता अर्थसंकल्प तयार करायचे स्थायी समितीच्या बैठकीत ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात सर्वसाधारण सभेत करवाढ झालेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. म्हणून आम्ही त्यावर आक्षेप घेतला व उपसूचनेद्वारे २७० कोटींचा अर्थसंकल्प मांडला. त्याला आता जिल्हाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली आहे. ही बाब काही लोकांना खटकल्याने टीका सुरू झाली आहे, पण २७० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्याने पालिकेला त्याची काय तोशीस आहे का? हे टीकाकारांनी स्पष्ट करावे, असेही यादव म्हणाले.
ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांना आज नगराध्यक्षा शिंदे यांचा भलताच कळवळा दिसतोय; पण पहिल्या काही दिवसांत पावसकरांनी नगराध्यक्षांना दिलेला त्रास समस्त कऱ्हाडकरांना माहीत आहे. त्यांच्यावर केलेले आरोप जरा पावसकर यांनी आठवून पाहावे, तर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पालिकेच्या एका बैठकीतून कशामुळे व कुणामुळे रडत बाहेर आल्या होत्या हेही त्यांनी सांगावे, असा चिमटाही राजेंद्र यादव यांनी विरोधकांना काढला.
चौकट
पावसकरांचे राजकारण काँग्रेसच्या कुबड्यावर..
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी जनशक्ती एकसंध आहे का? असा प्रश्न एका पत्रकार परिषदेत केला होता. याकडे राजेंद्र यादव यांचे लक्ष वेधताच ते म्हणाले, ‘आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं पाहायचं वाकून’ ही तर पावसकरांची प्रवृत्ती आहे. त्यांचे पालिकेतील राजकारण हे काँग्रेसच्या कुबड्यावर सुरू आहे. त्यांनी दुसऱ्याची मापे काढणेपेक्षा आत्मचिंतन केले तर बरे होईल.
चौकट
ऑडिओ, व्हिडिओ क्लिपही गायब
नुकत्याच मंजूर झालेल्या अर्थसंकल्पातील अनेक कागदपत्रे गहाळ झाली आहेत. कागदपत्र गहाळ होणे ही गोष्ट पालिकेच्या कारभाराला आता नवीन राहिली नाही; पण एका सभेची ऑडिओ, व्हिडिओ क्लिपही गायब झाली आहे. असा आरोप राजेंद्र जाधव यांनी यावेळी केला.