कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली आहे. थंडीच्या दिवसांत पिकांना रोग येतो. त्यामुळे खरीप पिकांची काढणी होताच शेतकरी रब्बी पिकांची टोकण करतात. सध्या काही ठिकाणी टोकणीचे काम सुरू आहे. बहुतांश क्षेत्रावर टोकण होऊन पिकांची उगवण झाली आहे. मात्र, थंडी कमी झाल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सध्याचे वातावरण रब्बी पिकांना हानिकारक असून, त्याचा पिकांच्या उगवणीवर परिणाम होत आहे.
विद्यार्थ्यांची पायपीट
पाटण : पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात आजही रस्त्यांविना शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. पाटण दुर्गम तालुका असल्याने आजही अनेक गावे रस्त्यांपासून वंचित आहेत. डोंगर, जंगल क्षेत्रात अनेक गावे असल्यामुळे येथे दळणवळण तसेच इतर सुविधांची कमतरता जाणवते. या ठिकाणी शासनाकडून अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात नसल्याने याचा विद्यार्थी, ग्रामस्थ व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
केळघर परिसरात डोंगरावर वणवा
मेढा : तालुक्यातील केळघरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोंगरावर वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. या वणव्यामुळे निसर्गसंपदेसह सूक्ष्मजीवांची हानी होत असून, वणवे लावण्यामुळे हिरवेगार डोंगर काळे पडू लागले आहेत. वणवा लावण्याने गवत चांगले उगवून येते, या भ्रामक कल्पनेतून वणवे लावले जातात. मात्र, त्यामुळे औषधी वनस्पती, झाडे तसेच सूक्ष्म जीवांचा बळी जात आहे. वनविभागाने याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे
वरकुटेत पोलिओ लसीकरण
वरकुटे मलवडी : वरकुटे मलवडी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला. यावेळी सरपंच बाळासाहेब जगताप, जालिंदर खरात, जयसिंग नरळे, खंडेराव जगताप, सदाशिव बनकर उपस्थित होते. पोलिओ निर्मूलनाच्या ध्येयपूर्तीसाठी शासनाने १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली. ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास पोलिओचा डोस पाजण्यात येत आहे.
गुढी उभारून विद्यार्थ्यांचे स्वागत
म्हसवड : पिंपरी (ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुढी उभारून शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रप्रमुख नारायण गावडे यांनी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करावे, असे आवाहन पाच केंद्रांतील मुख्याध्यापकांना केले होते. त्यानुसार पिंपरी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात गुढी उभारण्यात आली.
वाहतुकीची कोंडी
सातारा : शहरातील तहसील कार्यालयासमोर वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी वाहने, रिक्षा, मालवाहतूक करणारी वाहने याच मार्गावरून ये-जा करतात, तर अनेक वाहनधारक रस्त्याकडेला तसेच दुकांसमोर नो-पार्किंगमध्ये वाहने लावत आहेत. रस्त्यावर तसेच फूटपाथवर विक्रेत्यांची संख्या देखील वाढली आहे. पोलिसांच्या वतीने येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
डुकरांचा सुळसुळाट
सातारा : शहरातील सदर बझार परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेत पालिकेने वराहपालन करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने मोकाट डुकरे पकडली होती. मात्र, ही मोहीम थंडावल्याने सदर बझार, माची पेठ परिसरात डुकरांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. पालिकेने पुन्हा एकदा ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.