हणमंत पाटीलसातारा : ज्या सातारा जिल्ह्याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले आणि आधुनिक महाराष्ट्र घडविला; तसेच देशाचे उपपंतप्रधान म्हणून नेतृत्व करताना पुरोगामी विचार व बेरजेचे राजकारण केले. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात ‘यशवंतनीती’ आदर्श मानली जाते; परंतु याच जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपच्या नेत्यांनी चाणक्यनीतीद्वारे ‘ऑपरेशन लोट्स’चा यशस्वी प्रयोग करीत ऐतिहासिक विजय मिळविला; तसेच राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचाही करेक्ट कार्यक्रम झाला.त्याचे असेे झाले, वर्ष २०१७ नंतर तब्बल नऊ वर्षांनंतर ७ फेब्रुवारी २०२६ ला सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. राज्यात महायुतीची म्हणजे भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) अशी एकत्र सत्ता असतानाही जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचा विजायचा वारू रोखण्यासाठी शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी एकत्र आघाडी बांधून निवडणूक लढविली.
वाचा: भाजपनं बोलून नाही; करून दाखवलं!, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमागे काय राजकारण घडलं..९ फेब्रुवारी २०२६ ला निकाल हाती आला; पण भाजपला जिल्हा परिषदेत एकहाती सत्तेसाठी आवश्यक असलेला ३३ हा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यांना २७ जागांवर समाधान मानावे लागले; पण अपक्ष निवडून आलेल्या एका सदस्याने भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या २८ झाली; मात्र त्यांना बहुमतासाठी आणखी पाच सदस्यांची आवश्यकता होती. तरीही भाजपचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपचा होणार असल्याचा ठामपणे दावा केला.
सदस्यांची सहल, तरीही बेरजेऐवजी वजाबाकी...भाजपकडून सदस्य फोडाफोडीसाठी ‘ऑपरेशन लोट्स’ राबविण्याची धास्ती घेतलेल्या शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्व सदस्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गटनोंदणी केली. त्यानंतर ३७ सदस्यांना महिन्याभरासाठी सहलीवर नेले. कोणताही सदस्य फुटून जाऊ नये म्हणून पर्यटन घडवून आणले. शिवाय त्यांना काँग्रेस व स्वाभिमानी संघटनेच्या प्रत्येकी एका सदस्याचा म्हणजे २ सदस्यांचा पाठिंबा मिळाला.मात्र, सहलीवरून शुक्रवारी (दि. २०) थेट जिल्हा परिषदेच्या इमारतीखाली ट्रॅव्हल्समधून आलेल्या सदस्यांसाठी भाजपने अगोदरच चाणक्यनीतीने पोलिस बंदोबस्तात सापळा रचला होता. त्यामुळे बेरजेऐवजी त्यांच्या पाच सदस्यांनी भाजपला मतदान केले. तर दोन सदस्यांना सभागृहाबाहेरच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे सदस्यांना सहल घडवूनही बेरजेऐवजी वजाबाकी होऊन त्यांना ३७ ऐवजी ३० मते मिळाली.
जयकुमार, शिवेंद्रसिंहराजे ठरले ‘धुरंधर’...भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आमदार व जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, मनोज घोरपडे व कोरेगाव मतदारसंघात अप्रत्यक्ष शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांची साथ मिळाली. फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपच्या सर्व मंडळींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात ऐतिहासिक विजय मिळविण्याची ‘चाणक्यनीती’ आखली. जयकुमार गोरे व शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘ऑपरेशन लोट्स’द्वारे ही ‘चाणक्यनीती’ ‘धुरंधर’पणे यशस्वी करून दाखविली.
देसाई, पाटील राहिले गाफील...जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपला रोखण्यात शिंदेसेनेचे नेते व पालकमंत्री शंभुराज देसाई, तसेच राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांना यश आले नाही. मात्र, युद्धात जिंकलेले तिन्ही नेते भाजपशी तह करताना गाफील राहिले. खूप काळजी घेऊनही भाजपचे ‘ऑपरेशन लोट्स’ थोपविण्यात दोन्ही नेत्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कूटनीतीचा निषेध करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
अशी झाली बेरीज अन् वजाबाकी...निवडणुकीनंतरची बेरीज :१) राष्ट्रवादी (अजित पवार) २०, शिंदेसेना १५, काँग्रेस व स्वाभिमानी संघटना मिळून दोन म्हणजे एकूण बेरीज ३७ झाली.२) भाजप २७ अधिक एक अपक्ष बरोबर २८ सदस्य झाले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी वजाबाकी :१) राष्ट्रवादी १५, शिंदेसेना १३, काँग्रेस १ आणि स्वाभिमानी १ बरोबर ३० झाली. त्यामध्ये पाच सदस्यांनी भाजपला मतदान केले, तर दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.२) भाजप २७, अपक्ष १, राष्ट्रवादीचे ३ आणि शिंदेसेनेचे २ असे एकूण ३३ मतदान झाले.
Web Summary : In Satara ZP elections, BJP secured victory using 'Chanakya Niti,' overcoming the established 'Yashwant Niti'. Despite opposition attempts to consolidate, BJP strategically gained support, resulting in a significant win led by Jaykumar Gore and Shivendrasinharaje Bhosle.
Web Summary : सतारा ZP चुनावों में, भाजपा ने 'चाणक्य नीति' का उपयोग करके जीत हासिल की, और स्थापित 'यशवंत नीति' को पराजित किया। विपक्ष के समेकन के प्रयासों के बावजूद, भाजपा ने रणनीतिक रूप से समर्थन प्राप्त किया, जिसके परिणामस्वरूप जयकुमार गोरे और शिवेंद्रसिंहराजे भोसले के नेतृत्व में महत्वपूर्ण जीत हुई।