लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधितांनी येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ चार रस्ते एकत्र येत आहेत. रस्ता चांगला असल्याने अनेक वाहने भरधाव येत असतात. त्यातच आडव्या बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहे. यासाठी गतिरोधकाची मागणी होत आहे.
......................................................
नादुरुस्त ऊस वाहनांचा धोका
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू असल्याने ऊस वाहतूक वाहने धावू लागली आहेत; पण अनेक वेळा ही वाहने नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्याकडेला उभी करण्यात येतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यासाठी सर्वच तालुक्यात ऊस वाहतूक सुरू आहे. कारखान्याकडे ऊस नेताना काही वेळा वाहने नादुरुस्त होतात. त्यामुळे अशी वाहने रस्त्याच्याकडेला उभी केली जातात. रात्रीच्यावेळी या बंद वाहनांचा दुसऱ्या वाहनचालकाला अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
.........................................................
शेतीसाठी अखंडित
वीजपुरवठ्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे मलवडी : माण तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
माणमधील वरकुटे मलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा आदी पिके घेतली आहेत. सध्या ज्वारी, गहू पिकांना पाणी देण्यात येत आहे. भारनियमनाप्रमाणे वीज उपलब्धतेनुसार शेतकरी दिवसा तसेच रात्रीही पाणी देत आहे; मात्र अनेकवेळा वीज खंडित होते. त्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होतात. यासाठी अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
.................................................