दीपक देशमुख सातारा : पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २७ जणांचे प्राण गेले. या घटनेवेळी सातारा शहरातील व्यावसायिक सारंग माजगावकर हेही कुटुंबासह तेथून दोन किमी अंतरावर होते. गोळीबाराचा ऐकून त्यांच्या बसच्या चालकाने धावतच येत सर्वांना गाडीत बसण्याच्या सूचना केल्या व गाडी सुरक्षित ठिकाणी नेली. त्याच्या प्रसंगवधानामुळे तब्बल ३६ जणांचे प्राण वाचले असल्याचा थरारक अनुभव माजगावकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.सातारा येथील व्यावसायिक सारंग सुनील माजगावकर हे दि. १९ रोजी पत्नी व मुलीसह पुण्यातील एका ग्रुपतर्फे काश्मीरच्या सहलीवर गेले होते. घटनेदिवशी मंगळवारी ते पहलगाम येथे ज्याठिकाणी हल्ला झाला तेथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर होते. ते सर्व जण बैसरन व्हॅलीजवळ नदीकाठावर फोटोग्राफीचा आनंद घेत असतानाच गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
फटाक्यांचा आवाज वाटला; परंतु.. सुरुवातीला त्यांना हा फटाक्यांचा आवाज वाटला; परंतु बसच्या चालकाला मात्र काही तरी संशयास्पद वाटले. तो धावतच बसजवळ आला. त्याने सर्वांना झटपट बसमध्ये बसवले. चालकाने ही बस तेथून सुरक्षित ठिकाणी नेली. यानंतर सर्व ३६ पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लहान मुले भेदरून गेलीबसमध्ये १६ महिला, १७ पुरुष आणि ३ लहान मुले होती. काही अंतरावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून २७ जणांचे प्राण घेतल्याची माहिती लष्काराने दिली. यानंतर आपण कोणत्या संकटातून बचावलो, याची पर्यटकांना जाणीव झाली. या बाका प्रसंगामुळे लहान मुलेही भेदरून गेली. चालकाच्या चतुराईमुळे प्राण वाचलयाने सर्वांनी त्याचे आभार मानले.
सुरुवातीला हा फटाक्यांचा आवाज वाटला; परंतु गाडीचा चालकाने प्रसंगावधान बाळगून आम्हाला सुरक्षित ठिकाणी सोडले. त्याच्यामुळेच आम्हा ३६ जणांचे प्राण वाचले. सध्या चंदीगढ येथे असून तेथून उद्या पुणे येथे येणार आहोत. - सारंग माजगावकर, सातारा