पुसेगाव (जि.सातारा) : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पुसेगावात आलेल्या भाविकभक्तांनी श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर एकाच दिवसात ८६ लाख ६२ हजार ५०० रुपयांची देणगी अर्पण केली. यंदा गतवर्षीपेक्षा तब्बल १२ लाख ६२ हजार २४२ रुपयांची वाढ झाली आहे.पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी नोटांच्या माळा अर्पण करण्यास सुरू केली होती. भाविकांनी आपापल्या परीने १ रुपयापासून हजारो रुपये नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्याने महाराजांचा रथ नोटांनी शृंगारलेला होता.
मिरवणूक संपल्यानंतर नोटांच्या माळा, नाणी, परकीय चलन काढून एकत्र करण्यात आले. देवस्थानचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची रक्कम मोजण्यात आली. पहाटे चार वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पूर्ण झाले.
परकीय नोटा ही अर्पणश्री सेवागिरी महाराजांच्या रथावरील देणगीच्या रक्कमेत भारतीय चलन बरोबरच इतर देशातील चलनी नोटा भक्तांनी रथावर अर्पण केल्या. यामध्ये थायलंड, संयुक्त अरब अमिराती, कतार, युरो, इंग्लंड, अमेरिका, दुबई तसेच चीन, इजिप्त, रशिया, कोरिया, कुवेत, इंडोनेशिया, सुदान, युके, झिम्बाब्वे, बांगलादेशाच्या ही नोटांचा समावेश आहे.