म्हसवड : ‘माण-खटाव तालुक्यांतील होम आयसोलेशनमध्ये असलेल्या बाधित रुग्णांकडून घरी योग्य सुविधा नसल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे म्हणून वयस्कर आणि तीव्र लक्षणे असलेल्या बहुतांश बाधितांना रुग्णालयात तसेच कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करा. जे सुपरस्प्रेडर्स आहेत, त्यांच्या दर पंधरा दिवसांनी चाचण्या करा. लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना आमदार जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोना संसर्ग रोखण्यात दोन्ही तालुक्यांत लागेल ती मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित माण आणि खटाव तालुक्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत शैलेश सूर्यवंशी, जनार्दन कासार, तहसीलदार बाई माने, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, नगराध्यक्ष धनाजी जाधव, डॉ. युनूस शेख, डॉ. कोडोलकर, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, राजकुमार भुजबळ, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील रुग्णांच्या घरी आयसोलेशनच्या सर्व सुविधा नसतात. लक्षणे नसणारे रुग्ण घराबाहेर पडतात. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे शक्य तितक्या अधिक बाधितांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करावे लागणार आहे. दुकानदारांच्या १५ दिवसांनी चाचण्या करा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करा. संसर्ग रोखण्यासाठी सर्वेक्षण आणि इतर कामे करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर त्वरित सुरू करा.’
बैठकीत दोन्ही तालुक्यांतील सध्याचे बाधित, उपचारार्थ रुग्ण, उपचाराची व्यवस्था, उपलब्ध स्टाफ, लागणारी औषधे, झालेले लसीकरण, सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर्सचा त्यांनी आढावा घेतला.
प्रांत शैलेश सूर्यवंशी यांनी दोन्ही तालुक्यांतील सीसीसी सुरू करण्यासंदर्भात तसेच रुग्णांच्या संपर्कातील हाय आणि लो रिस्क संशयित शोधण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आल्याची माहिती दिली. संशयित संपर्क व्यक्ती शोधण्याचे माण तालुक्यातील प्रमाण एकास साडेनऊ, तर खटाव तालुक्यातील प्रमाण एकास साडेसतरा आहे. त्यात वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
(चौकट)
बैठकीतून जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन!
सध्या कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका चालकांअभावी बंद असल्याचे समजताच आ. गोरेंनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी फोनवरून चर्चा केली. रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगून चालकांची नेमणूक त्वरित करण्याविषयी सांगितले. डॉ. चव्हाण यांनीही लवकरच रुग्णवाहिका सुरू करण्याची ग्वाही दिली. आशा स्वयंसेविकांना कोविडकाळात काम करण्यासाठी अधिक मदत द्यावी लागली, तर आमच्या मायणी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीकडून ती मदत करू, असेही आ. गोरे यांनी सांगितले.
०५दहिवडी
फोटो : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी येथे आयोजित बैठकीत आ. जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि अधिकारी उपस्थित होते.