प्रमोद सुकरेकऱ्हाड : विधानसभा निवडणुकीत एकमेकांसोबत असणारे विद्यमान आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यात अवघ्या चार महिन्यातच बरेच अंतर पडलेले दिसते. त्याचाच प्रत्यय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आला आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्याविरोधात भाजपचेच जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पॅनेल उभे ठाकल्याचे दिसत आहे.यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल २५ वर्षांनंतर प्रथमच होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तर मतदारसंघात ‘कमळ’ फुलल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा विश्वास चांगलाच दुणावला. त्यामुळे त्यांनी सह्याद्री कारखाना निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी विरोधक एकवटतील असे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी झाल्या अन् तिसऱ्या पॅनेलला निमंत्रण मिळाले. आता त्याच्याही उलटसुलट चर्चा झाल्या नाही तर नवलच!
मेळ कोणी घालणे अपेक्षित होतेखरंतर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाजी मारल्याने भाजपला वातावरण चांगले दिसत आहे. अशा परिस्थितीतच सह्याद्री कारखान्याची होऊ घातलेली निवडणूक अटीतटीची होईल अशी चर्चा वर्तवली जात होती. पण भाजपच्याच दोन नेत्यांनी स्वतंत्र पॅनेल रिंगणात टाकल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. पण, भाजपचा हा मेळ बसायला पाहिजे होता अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. काहींच्या मते आमदार म्हणून घोरपडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात कमी पडले. दुसरीकडे काहीजण भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनीच सर्वांना बरोबर घेऊन मेळ घालायला हवा होता, असे दोन मतप्रवाह सुरू आहेत. त्यामुळे भाजपा अंतर्गत मेळ घालण्यात नेमके आमदार कमी पडले की जिल्हाध्यक्ष? हा आता स्वतंत्र अभ्यासाचा विषय झाला आहे.
पदाधिकाऱ्यांची कोंडीकऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये कधी नव्हे ते ‘कमळ’ फुलले आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पण, कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याचे दिसत आहे. आमदार मनोज घोरपडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी एकमेकांविरोधात भूमिका घेतल्याने इकडे आड, तिकडे विहीर, अशी कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय?नजीकच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीत एकवटलेली भाजप कार्यकर्त्यांची मने कारखाना निवडणुकीमुळे दुभंगलेली दिसत आहेत. आता ती पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकवटण्याचे आवाहन नेत्यांना पेलणार का? भविष्यातील राजकारणावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा विचार नेत्यांनी केला आहे का? असा प्रश्न आता कार्यकर्ते विचारू लागले आहेत.