नेबापूर (ता. पन्हाळा) येथील संजीवनी हाॅस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या रुग्णाचा मृतदेह हाॅस्पिटलने परस्पर नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याने हाॅस्पिटलवर कारवाई करण्याचे निर्देश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल कराडच्या मुख्याधिकाऱ्यांनी तयार केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, कुठरे (ता. पाटण) येथील एक कोरोनाबाधित नेबापूर (ता. पन्हाळा) येथील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार घेत होता. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह हॉस्पिटलने कोणत्याही पत्राशिवाय नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
दरम्यान, सदरचा मृतदेह घेऊन नातेवाईक कराडच्या स्मशानभूमीत दाखल झाले. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दर्शवला. मुख्याधिकारी डाके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. रुग्णांच्या नातेवाइकांकडे रुग्णाचा मृत्यू कशाने झाला आहे? याबाबतचे हॉस्पिटल प्रशासनाने काही पत्र दिले का? याची माहिती घेतली. मात्र, नातेवाइकांकडे कोणतेही पत्र नव्हते. मुख्याधिकारी डाके यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. वस्तुस्थितीची त्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर संबंधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले; पण कोरोनाबाधित मृतदेह परस्पर नातेवाइकांच्या ताब्यात देणे चुकीचे आहे. संबंधित रुग्णालयाने कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे मुख्याधिकारी डाके यांनी संजीवनी हॉस्पिटलच्या विरोधात कारवाईचा अहवाल तयार करून पाठविला आहे.