दहिवडी : अतिशय तोकडे मानधन तेही वेळेत मिळत नाही. मात्र, कठीण काळातही देवदूत बनून राहिलेल्या बिदालच्या आशासेविका पुष्पांजली मगर यांनी योगाच्या माध्यमातून अनेक कोरोना रुग्ण बरे केले. याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना मिळताच त्यांनी स्वतः दखल घेऊन कौतुकही केले.
पुष्पांजली मगर या पाणी फाउंडेशन प्रशिक्षक, योगा प्रशिक्षक म्हणूनही काम करतात. समाज सेवेचा पिंड असल्याने आशासेविका म्हणून त्यांचा तालुक्यात नावलौकिक आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगारासाठी प्रोत्साहन दिले आहे. कोरोनाच्या काळात सर्वप्रथम सक्रिय सहभाग त्यांनी घेतला. त्यांच्याकडे असणाऱ्या भागाचे त्यांनी फुलेनगर येथे जिल्हा परिषद शाळेत कोरोना पेशंटचे विलगीकरण केले. पगारापुरते काम न करता स्वतः रॅपिड टेस्ट केल्या. रोज सकाळी जाऊन योगाचे धडे देऊ लागल्या. अनेकांची ऑक्सिजन लेवल खाली आली असताना त्यांना दोन- तीन दिवसांत फरक पडू लागला. चालायला न येणारे पेशंट पळायला लागले. अशा रुग्णांना धीर देत त्यांनी संपूर्ण बिदालात काम पाहिले. प्रत्येक रुग्णाची माहिती तयार केली. रोज तपासणी केली. अडचण वाटल्यास वरिष्ठांशी संपर्क केला. त्यामुळे बिदाल गावातून त्यांचे कौतुक होत आहे. देवदुताप्रमाणे कोणत्याही कामात हिरीरीने भाग घेणाऱ्या मगर यांची दखल थेट जिल्हाधिकारी यांनी घेतली, शाबासकीही दिली, तसेच योगाचे देत असलेल्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ पाठवा, असेही सांगितले.
चौकट
मला पगार किती मिळतो, यापेक्षा या मातीची सेवा करण्याचे भाग्य मिळतेय हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. या कठीण प्रसंगात माणसे जगली पाहिजेत, त्यांना आनंदी ठेवणे हे माझे कर्तव्य समजते.
- पुष्पांजली मगर,
आशासेविका बिदाल.
०३दहिवडी
बिदाल येथे कोरोना रुग्णांना आशासेविका पुष्पांजली मगर योगाचे धडे देत आहेत. (छाया : नवनाथ जगदाळे)