कोरेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या असून, ग्रामीण भागातील शाळांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांच्या वतीने इन्फ्रारेड थर्मामीटरचे तर सर्वसामान्य जनतेसाठी औषधी साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात बुधवारी दुपारी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्याकडे साहित्य सोपविले. यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, कोरेगाव तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. गणेश होळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. राजन काळोखे, डॉ. योगेश टिकोळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तेजस शिंदे म्हणाले की, कोरोनाकाळात आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग केले. कोरेगाव ग्रामीण रुग्णालयासह सातारा व खटाव तालुक्यात आरोग्य विभागाद्वारे उपाययोजना करत आधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित केली, त्याचा फायदा आज सर्वसामान्य जनतेला होत आहे. शाळांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक औषधी साहित्य यावेळी देण्यात येत असून, सामान्यातील सामान्य रुग्णास त्याचा लाभ व्हावा, हा हेतू त्यामागे असल्याचे तेजस शिंदे यांनी सांगितले.
यावेळी राजाभाऊ जगदाळे व डॉ. गणेश होळ यांनी इन्फ्रारेड थर्मामीटर व औषधी साहित्य वितरण करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी मायावती शिंदे व विशाल कुमठेकर, आरोग्य विस्तार अधिकारी अमर निंबाळकर, आरोग्य सहाय्यक विठ्ठल ओंबळे, सेवक मन्सूर मुलाणी यांच्यासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.....
फोटोनेम : एनसीपी मेडिकल साहित्य वितरण. जेपीजी.
फोटो ओळ : आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे साहित्य सोपविताना तेजस शिंदे. समवेत राजाभाऊ जगदाळे, डॉ. गणेश होळ, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे, डॉ. रवींद्र खंदारे, व मान्यवर.