कार्वे : संजय गांधी निराधार योजनेमार्फत कार्वे (ता. कऱ्हाड) येथील १५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे प्रमाणपत्रही वितरित करण्यात आले आहे.
सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना महामारीने होत्याचे नव्हते झाले. या काळात ज्यांच्या कुटुंबातील कर्ते पुरुष, पालक मृत झाले, त्यांच्या वारसांना तसेच अपंग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेकडून लाभ देण्यात येत आहे. त्याबाबतची प्रकरणे तयार करण्यात येत आहेत. कार्वे ग्रामपंचायतीने त्यासाठी गावातील लाभार्थ्यांना मदत करून त्यांची प्रकरणे तयार केली. संजय गांधी निराधार योजनेमुळे या कुटुंबांना हातभार मिळणार आहे. गावातील एकूण १५ लाभार्थ्यांची या योजनेत निवड करण्यात आली असून, त्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. संबंधितांना विशेष सहाय्य योजनेचे प्रमाणपत्रही वितरित करण्यात आले आहे.
प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमावेळी सरपंच संदीप भांबुरे, माजी सरपंच अधिकराव गुजले, तलाठी नीलेश गवंड, ग्रामसेवक चंद्रकांत पवार, कोतवाल प्रदीप वायदंडे उपस्थित होते. ही प्रकरणे मंजूर करण्याच्या कामास विजया थोरात यांचे सहकार्य लाभले.
फोटो : २८केआरडी०१
कॅप्शन : कार्वे (ता. कऱ्हाड) येथे सरपंच संदीप भांबुरे यांच्याहस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.