लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात सोमवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ६२३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून, १७ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा दर आणखी कमी झाल्याने नागरिकांची चिंता कमी झालेली आहे.
सातारा आणि खटाव हे दोन तालुके वगळता इतर नऊ तालुक्यांमध्ये १०० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. महाबळेश्वर तालुक्यात केवळ नऊ रुग्ण सापडले, तर सर्वात जास्त १६४ रुग्ण सातारा तालुक्यात सापडले. जावली, खंडाळा, कोरेगाव, माण, पाटण, फलटण या तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८१ हजार १६१ इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील घटू लागले आहे. जिल्ह्यात सोमवारी १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरेगाव, पाटण, महाबळेश्वर या तालुक्यामध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर सातारा तालुक्यातील मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात सोमवारी केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ६५ इतकी झाली असून, त्यात सातारा तालुक्यातील १ हजार १४८ सर्वाधिक मृत्यू आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या सोमवारी संध्याकाळपर्यंत २ हजार ६४ नागरिकांना घरी सोडण्यात आले. ९ हजार २६७ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
रुग्ण वाढीचा दर ८.९७ %
जिल्ह्यात सोमवारी ५ हजार ५९२ तपासण्या करण्यात आल्या. त्यातून ६२३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. रुग्ण वाढीचा दर आणखी कमी होऊन ८.९७ टक्के इतका झाला आहे.