कराड : येथील नगरपालिकेची बुधवारी ऑनलाईन सभा झाली. मुळात ४० विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यास जनशक्ती आणि लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना भाग पाडले. त्यामुळे खडाजंगी होऊन ऑनलाईन सभा रद्द करण्यात आली. त्यानंतर कोविड विषयावर सभा होऊन शहरात राबवायच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.
सदरची ऑनलाईन सभा दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. तत्पूर्वी काल जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी नगराध्यक्षांना पत्र देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या विषयावर विशेष सभा तातडीने घेण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सभेला सुरुवात झाल्यानंतर राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी नगराध्यक्षांना कोरोनावर विशेष सभा का बोलावण्यात आली नाही, आजच्या विषय पत्रिकेत कोरोना उपाययोजनांचे विषय का नाहीत? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.
दरम्यान, बहुमताच्या जोरावर विशेष सभा रद्द करून तातडीने कोरोनाविषयक उपाययोजनांवर चर्चा करण्याबाबत विशेष सभा काढावी, त्यानंतर जनरल मिटिंग काढण्यात यावी, असा पवित्रा जनशक्तीने घेतला. या विषयावर बराच वेळ चर्चा झाली. मात्र, नगराध्यक्षांना विशेष सभा रद्द करावी लागली. त्यानंतर झालेल्या सभेत कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा झाली.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात १०० च्या आसपास रुग्ण असून लसीकरण वाढवावे लागणार असल्याचे सांगितले. लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याबरोबरच यासाठी खासगी डॉक्टर्स, नर्सेस व अन्फ स्टाफ वाढवावा लागणार आहे. नगरसेवकांनी यासाठी सहकार्य करावे. कोरोनाबाबतच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
चौकट
व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्या
मिनी लाॅकडाऊनमुळे व्यापारीवर्गात असंतोष आहे. त्यांचे आर्थिक मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे कडक नियम लावून त्यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.