सातारा : कोरोना रुग्णालये, प्राणवायू प्रकल्पांसह अत्यावश्यक सेवांना महावितरणकडून तातडीने वीज देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सातारा येथे झालेल्या आढावा बैठकीत आॅक्सिजन प्रकल्पांना तातडीने वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या प्राणवायू प्रकल्पाचीही वाढीव वीजभाराची मागणीही महावितरणकडून तातडीने पूर्ण करण्यात आली आहे.
कऱ्हाड तालुक्यातील ढेबेवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन शंभर सिलिंडर क्षमतेचा प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाला कार्यान्वित करण्यासाठी ६० किलोवॅट क्षमतेचा वाढीव वीजभार घेणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या रोहित्राची क्षमता १०० हून २०० केव्हीए करणे गरजेचे होते. १ जून रोजी जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाढीव भार मागणीचे प्राप्त झाले. पत्र मिळताच अवघ्या २४ तासांत मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड व कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन रात्रीतून रोहित्राची उपलब्धता केली व वाढीव वीजभार जोडून देण्याचे काम केले आहे.
यासाठी मल्हारपेठचे उपकार्यकारी अभियंता अमित आदमाने, शाखा अभियंता विशाल मोहिते व ठेकेदार मे. पॉवर इंजिनियर्स व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कोरोनासारख्या महामारीमध्ये महावितरणने सर्व स्तरांवर दाखविलेल्या कार्यतत्परतेचे सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभागानेही कौतुक केले आहे.
कोट :
कोविडकाळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची अभिमानास्पद कामगिरी राहिली आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत सेवा देण्यास कर्मचारी सज्ज असल्याने विनाविलंब कामे करण्यात आली. यासाठी कामगार कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे विशेष कौतुक आहे.
- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता
सोबत : फोटो आहेत.