शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सेवागिरी महाराजांचे देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

सन १९०५ मध्ये सेवागिरी महाराजांचे पुसेवाडी येथे जोतिराव जाधव व श्रीरंग जाधव यांच्याबरोबर आगमन झाले. महाराज पुसेगावला आले, त्यावेळी ...

सन १९०५ मध्ये सेवागिरी महाराजांचे पुसेवाडी येथे जोतिराव जाधव व श्रीरंग जाधव यांच्याबरोबर आगमन झाले. महाराज पुसेगावला आले, त्यावेळी पुसेगाव हे ‘पुसेवाडी’ नावाचे लहानसे खेडे होते. सुरुवातीला येथे धनगर कुटुंब राहत होते. पुसेवाडीची नोंद पूर्वी नेर-पुसेवाडी अशी होती. त्यानंतर बारामती तालुक्यातील परींचे गावाहून शहाण्णवकुळी मराठा येऊन स्थायिक झाले. त्यातीलच जोतिराव जाधव व श्रीरंग जाधव यांच्याबरोबर महाराज पुसेवाडी येथे आले होते.

श्री सेवागिरी महाराजांनी अनेक चमत्कार पुसेगावमधील ग्रामस्थांना दाखविले. नंतर गावकऱ्यांनी महाराजांवर श्रद्धा आणि सख्यताचा वर्षाव केला. त्यामुळे गावाचे स्वरूप पालटून गेले. महाराजांनी गावकऱ्यांना सत्कारणी लावले. तसेच ते गावातील लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असत. दु:खाच्या प्रसंगी ते लोकांना मदत करीत होते. गावावर संकटे आली किंंवा आपत्ती आली की, महाराज त्यांच्या पाठीशी उभे राहत. महाराजांनी शंकरराव जाधव यांच्या मृत मुलाला जिवंत केल्यापासून तर लोकांनी अक्षरश: अपार श्रद्धेने महाराजांना डोईवर घेतले.

महाराज असताना मंदिरात कार्यक्रमावेळी व बागेत काम करतेवेळी गावातील लोकांची त्यांना मदत असे. महाराजांची समाधी, दत्तमंदिर, पार, धुनी व एक मजली इमारत. जी त्यांच्या हयातीत बांधली, त्याकरिता सीताराम जामदार व सीताराम गुरव यांनी त्यांना बांधकामात मदत केली. तसेच इतर ग्रामस्थांनी त्यावेळी पैसा, दोन पैसे, एक आणा, चवली, पावली, अधेली व रुपया अशा स्वरूपात महाराजांना देणगी दिली. त्याचा सर्व जमा खर्च महाराजांनी त्यांचे स्वहस्ताक्षरात लिहून ठेवला होता.

मार्गशीर्ष वद्यचर्तुदशी १० जानेवारी १९४८ रोजी जेव्हा महाराजांनी आपला आत्मा पंचतत्त्वात विलीन केला. म्हणजेच, ‘संजीवन समाधी’ घेतली. तेव्हा सर्व गावकरी अतिशय दु:खी झाले व सर्वांनी जड अंत:करणाने ‘श्री सेवागिरी महाराज की जय’ असा जयजयकार केला. त्यानंतर पुढील वर्षी दसऱ्यादिवशी सर्व जातीधर्मांतील ग्रामस्थ सिद्धेश्वर मंदिरात एकत्रित झाले. त्यादिवशी त्यांनी नारायणगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ दहा दिवसांची यात्रा भरविण्याचा निर्णय घेऊन यात्रा व प्रदर्शन कमिटीचे चेअरमन म्हणून मारुती कुंडलिक जाधव यांची एकमताने निवड केली. पूर्वी गावात भैरोबाची यात्रा भरत होती. ती बंद करून महाराजांना ग्रामदैवत समजून सर्व ग्रामस्थांनी यात्रेस पूर्णपणे वाहून घेतले. चेअरमन व मठाधिपती यांनी वर्षभर देवस्थानचा व यात्रेचा जमाखर्च ठेवून त्या जमा खर्चास चैत्री पाडव्यादिवशी ग्रामसभेची मंजुरी घेण्याचे ठरले.

१९४९ पासून पुसेगावातील ग्रामस्थ पूर्वेकडील जमिनीत रबी पिके न घेता, ती यात्रेसाठी मोकळी ठेवत असतात. २००३ पर्यंत यात्रातळावरील शेणखाताच्या लिलावाचे पैसे शेतकरी देवस्थानला जमा करून देत असत. सुरुवातीला तर गावामध्ये सक्तीने घरटी लोकवर्गणी गोळा केली जात असे.

यात्रा दहा दिवसांसाठी भरविण्याचा निर्णय गावाने घेतल्यानंतर तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य तात्याराव आनंदराव जाधव यांनी तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्या मध्यस्थीने तत्कालीन जिल्हाधिकारी हुबळी यांच्याकडून दहा दिवसांच्या यात्रेस रितसर शासकीय परवानगी मिळविली. त्यानंतर नारायणगिरी महाराजांच्या उपस्थितीत यात्रा व प्रदर्शन कमिटीसाठी लिखित घटना तयार करण्यात आली.

त्या घटनेनुसार दरवर्षी दसरा सणादिवशी पुसेगावमधील ग्रामस्थांची ग्रामसभा होऊन पुढील वर्षाचा देवस्थान व यात्रेचा कारभार पाहण्यासाठी चेअरमनची एकमताने निवड केली जात असे. त्यामध्ये एकमत न झाल्यास दिवाळीत पाडव्यादिवशी पुरुष मतदारांच्या मतदानाने चेअरमनची निवड १९७४ पर्यंत करण्यात येत होती.

श्री सेवागिरी महाराज यांच्या श्रद्धा, सेवा व नम्रता हीच खरी उपासना या शिकवणीनुसार पुसेगावातील सर्व ग्रामस्थांची ‘श्रीं’च्या चरणी अपार श्रद्धा आहे व या श्रद्धेतून महाराजांनी स्थापन केलेल्या मठामध्ये व त्या अनुषंगाने महाराजांना अर्पित केलेल्या देणगीतून भाविकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामस्थांचे सेवागिरी देवस्थानमध्ये व यात्रेत अनमोल सहकार्य असते.

मुळात सेवागिरी महाराजांच्या यात्रा व इतर विकासकामामध्ये लोकसहभाग राहावा म्हणून १९७२ मध्ये सार्वजनिक न्यासाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये मठाधिपतींची नेमणूक तहह्यात विश्वस्त म्हणून आहे व इतर सहा विश्वस्तांची निवड निवडणुकीने केली जाते. निवडणुकीनुसार सध्या खालील विश्वस्त कार्यरत आहेत. चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव तर सचिव अविनाश देशमुख काम पाहत आहेत. मंदिरातर्फे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्ये पार पाडली जातात. त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा असतो. महाराष्ट्रासह, गुजरात, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांच्या विविध भागांतून लाखो भाविकांची मांदियाळी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे रथोत्सवादिवशी पुसेगावमध्ये जमत असते. या यात्रेचे नियोजन पुसेगावचे ग्रामस्थ रात्रंदिवस झटून करत असतात.

या वार्षिक यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गुजरात राज्यांसह विविध ठिकाणांहून लाखो भाविक हजेरी लावतात. मुख्य दिवस असलेल्या रथोत्सवादिवशी एकाच दिवसात महाराजांच्या रथावर चाळीस-पन्नास लाख रुपये मोठ्या भक्तिभावाने अर्पण केले जातात. यात्रेकरिता दोन महिने अगोदरपासून सर्वजण नियोजनाला लागलेले असतात. दिवाळीच्या आसपास पहिली ग्रामसभा होते, ती प्राथमिक सभा असते. त्यामध्ये अनुभव व नियोजनात राहून गेलेल्या त्रुटींविषयी व भावी काळात करावयाच्या सुधारणांविषयी ऊहापोह केला जातो. त्यानंतरच्या बैठकीत यात्रेतील कामांचे नियोजन करण्यासाठी जागा वाटप समिती, व्हॉलिबॉल समिती, बैलगाड्या शर्यती समिती, कुस्ती समिती, रथनियंत्रण समिती, रथावर उभ्या लोकांची समिती, प्रसाद वाटप समिती आदी समित्यांची स्थापना ग्रामस्थांमधून केली जाते व सर्व कामांची जबाबदारी त्या-त्या समित्यांतील ग्रामस्थांवर सोपविली जाते. सर्व सदस्य तन, मन, धनाने अहोरात्र झटून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी झटत असतात. प्रत्येक गावकरी मंदिरातील कार्य म्हणजे, आपल्या घरातीलच कार्य आहे, असे समजून पार पाडत असतात. यात्राकाळात एक प्रकारे सर्व ग्रामस्थच स्वयंसेवकाची भूमिका पार पाडत असतात. यात्राकाळात यात्रातळावरील जागा संबंधित जागामालक आपली जागा व शेतजमिनी देवस्थानला विनामोबदला उपलब्ध करून देत असतात.

सर्व ग्रामस्थ रथ ओढण्यापासून ते रथ नगरप्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरात येईपर्यंत व त्यानंतर रथावरील नोटा वेगवेगळ्या करून नोटांची मोजणी होईपर्यंत सर्वचजण काम करत असतात. याशिवाय मंदिरामध्ये वर्षभर साजरे केले जाणारे सण, उत्सव, पारायण, संगीत सेवा, सप्ताह, व्याख्यानमाला तसेच दररोज मंदिरात केले जाणारे मोफत अन्नदान आदींमध्ये ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

या देवस्थानतर्फे आतापर्यंत ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाची ३६ लाखांपेक्षा जास्त कामे पार पडली आहेत. केवळ लोकांच्या सहकार्यातून देवस्थानने जलसंधारणाच्या कामाचा एवढा मोठा डोंगर उभा केला.

त्यामुळे गावातील व पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले. देवस्थानने या जलसंधारणाच्या केलेल्या कामाची दखल घेऊन शासनाने संस्था गटातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवस्थानला दिला होता.

तसेच कोट्यवधी रुपये तीर्थक्षेत्र विकासनिधीतून आज श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने मंदिरात नूतनीकरणाबरोबरच भोजनगृह, गावातील अंतर्गत रस्ते व विविध कामांचा डोंगर गेल्या दोन-तीन वर्षांत उभा केला आहे.

- केशव जाधव, पुसेगाव