वरकुटे-मलवडी : महाबळेश्वरवाडी (ता. माण) येथील तलावाच्या पूर्वेला असणाऱ्या दादासो आकाराम निंबाळकर यांच्या शेतात असणाऱ्या विद्युत खांबावर शाॅर्टसर्किट झाल्याने बियाण्यांसाठी राखीव ठेवलेल्या पंधरा गुंठे ऊसासह ठिबक सिंचनच्या नळ्या, व्हॉल्व्ह चेंबर आदी शेती उपयुक्त साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वरवाडी तलावाच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या दादासो निंबाळकर यांच्या शेतात असणाऱ्या विद्युत खांबावर स्पार्किंग होऊन ठिणग्या उडत असल्याच्या घटना अधूनमधून घडत होत्या. याबद्दलची सविस्तर माहिती महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. तरीसुद्धा वेळेत दखल घेऊन या विद्युत खांबावरील झालेला बिघाड दुरुस्त न केल्याने, गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता या खांबावरील विद्युत बिघाडामुळे ऊसाच्या शेतात ठिणग्या पडून ऊसासह अन्य शेती उपयुक्त उपकरणे आदी साहित्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या घटनेची तलाठी गणेश म्हेत्रे यांनी पंचनामा केला असून, शासकीय नियमानुसार कार्यवाही होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
(कोट)
सात-आठ वर्षांनंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने तलावात भरपूर पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हातातोंडाशी आलेल्या पिकांवर अवकाळीने घाला घातला. यावर्षी जरा हवामानाने साथ दिली आहे. मात्र, महावितरणच्या गचाळ कारभारामुळे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी या घटनेची दखल घेऊन संबंधितांकडून नुकसान भरपाई मिळावी.
-दादासो निंबाळकर, शेतकरी, महाबळेश्वरवाडी, ता. माण
०६वरकुटे मलवडी
फोटो : शाॅर्टसर्किटमुळे माण तालुक्यातील महाबळेश्वर येथील दादासो निंबाळकर यांच्या शेतातील ऊसाचे पीक जळून खाक झाले.