लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहर व परिसरात असलेली निर्जन स्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनले असून, अशा ९ अड्ड्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग केले जात आहे. यामुळे ही ठिकाणे पोलिसांसाठी संवेदनशील अशीच आहेत.
निर्भया अत्याचार प्रकरणानंतर प्रत्येक शहरातील निर्जन स्थळांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सातारा पोलिसांनी शहरातील काही निर्जन स्थळे शोधून काढली आहेत. या ठिकाणी फारशा उपाययोजना झाल्या नाहीत. तेथील गुन्हेगारी मात्र कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. रात्री- अपरात्री निर्जनस्थळी बसून, गांजा, दारू रिचवली जात होती, तसेच निर्जनस्थळी लपून बसून रात्री पुन्हा चोरीसाठी चोरटे बाहेर पडत होते. त्यामुळे निर्जन स्थळांवरच पोलिसांनी वाॅच ठेवला.
चाैकट :
ही ठिकाणे धोक्याचीच...
पाॅवर हाउस, समर्थ मंदिर...
इथे अनेक वर्षांपासून शासकीय इमारत पडून आहे. या इमारतीच्या काही भिंती पडलेल्या आहेत. इथेच रात्रीच्या सुमारास अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांच्या गस्ती पथकाला इथे वारंवार गस्त घालावी लागतेय.
चाैकट : बोगद्यातील फरशी कट्टा
समर्थ मंदिर येथील बोगदा ओलांडल्यानंतर तिथे काही पानटपऱ्या वसल्या आहेत. इथे रात्रीच्या सुमारास काही जण बसलेले असतात. रात्रीची रहदारी अत्यंत कमी असते. पूर्वी या ठिकाणी लुटमारीच्या घटनाही घडल्या होत्या. आता इथे काही घडत नसले तरी पोलिसांचा वाॅच मात्र कायम आहे.
चाैकट : पंचायत समितीशेजारी रस्ता
पंचायत समितीकडून मोनार्क चाैकाकडे जाणारा रस्ता हा निर्जन म्हणून ओळखला जातो. रात्रीच्या सुमारास इथे काही जण गांजा ओढत बसतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी एका महिलेची छेड या गांजा ओढणाऱ्या लोकांनी काढली होती. संबंधित महिलेने तक्रार दिल्यानंतर असे प्रकार पूर्णपणे थांबल्याचा दावा पोलीस करत आहेत.
चाैकट : पोलिसांकडे ९ ठिकाणांची यादी
शहर व परिसरात पोलिसांनी निर्जन ठिकाणांची यादी तयार केली असून, यादीमध्ये ९ ठिकाणांचा समावेश आहे. समर्थ मंदिर येथे दोन ठिकाणे, मोळाचा ओढा, शाहू क्रीडा संकुल, जुने मोटार स्टँड, जुना आरटीओ चाैक, बाॅम्बे रेस्टाॅरंट आणि वाढे फाटा चाैक या ठिकाणांचा त्यामध्ये निर्जन ठिकाण म्हणून समावेश करण्यात आला आहे.
चाैकट : मिळालेल्या निधीचे काय केले
निर्जन ठिकाणी वीज व इतर व्यवस्थेसाठी निधीदेखील देण्यात आला आहे. मात्र, या निधीचे नेमके काय झाले, याची माहिती मात्र कोणाकडे उपलब्ध नाही. यांना विचारा, त्यांना विचारा, अशीच उत्तरे पोलिसांकडून देण्यात आली.
चाैकट : शहरातील महिला अत्याचाराच्या घटना
२०१८-९
२०१९-४
२०२०-६
२०२१-५
कोट : पोलिसांकडून शहरात गस्त सुरूच आहे; पण शहराच्या बाहेर असलेल्या निर्जनस्थळीही पोलीस जातायत. विशेषत: सायंकाळच्या सुमारास इथे पोलीस जात असतात. जेणेकरून मुलींची छेडछाड व गैरप्रकार घडू नयेत म्हणून खबरदारी घेतली जातेय.
-सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा