रहिमतपूर : ‘कोरोना या जागतिक महामारीने रहिमतपुरातील जनता वर्षापासून त्रस्त आहे. टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प होऊन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सर्व मिळकतदारांची घरपट्टी माफ करावी,’ अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शेखर माने यांनी केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे जनता वर्षापासून त्रस्त आहे. या त्रासापासून नागरिकांची अद्याप सुटका झालेली नाही. आजही कोरोनाबाधित रुग्ण रहिमतपुरात सापडत आहेत. अनेकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. वर्षभरामध्ये टाळेबंदी, संचारबंदीमुळे रहिमतपुरातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, व्यापारी, कामगार, कर्मचारी आदी सर्वच स्तरातील नागरिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांना पुन्हा पायावर उभं राहण्यासाठी रहिमतपूर पालिका प्रशासनाने घरपट्टी माफ करून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष शेखर माने, सतीश लवंगारे, हणमंत कुंभार, सुवर्णा कदम आदी नागरिकांच्या सह्या आहेत.