रहिमतपूर : ‘वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी माझी वसुंधरा या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे,’ असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत रहिमतपूर नगर परिषदेने येथील गांधी मैदानावर हरित सायकल महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला झेंडा दाखवून बाळासाहेब पाटील यांनी प्रारंभ केला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, नगराध्यक्ष आनंदा कोरे, तहसीलदार अमोल कदम, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, उपनगराध्यक्षा सुरेखा माने उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘पृथ्वीचे आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे. तसेच वृक्षतोड थांबवली पाहिजे. बेसुमार वृक्षतोडीमुळे आपण निसर्गनिर्मित अनेक संकटांना सामोरे जात आहे. यापुढे प्रत्येकाने वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा.’
पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हरित सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यातून वृक्ष लागवड व संवर्धन याबाबतचे नागरिकांना महत्त्व पटवून देणार असल्याचे आनंदा कोरे यांनी स्पष्ट केले. या वेळी हरित शपथ घेण्यात आली. रहिमतपूर शहरातून काढण्यात आलेल्या हरित सायकल महारॅलीमध्ये पालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे विद्यार्थी, विविध संघटना, नागरिक सहभागी झाले होते. नगरसेवक विद्याधर बाजारे यांनी सूत्रसंचालन केले. शिवराज माने यांनी आभार मानले.
फोटो : ०६रहिमतपूर
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील हरित सायकल महारॅली प्रसंगी हरित शहराची शपथ घेण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)