कऱ्हाड : गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्याची धामधूम सर्वत्र दिसून येत आहे. कऱ्हाड शहरातील कुंभारवाड्यात गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत तर गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजून गेली आहे.
यंदा दहा सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गतवर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली नव्हती. घरगुती गणेशांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. कोरोनामुळे दोन वर्षांपासून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजून गेली आहे. हार, लाईटच्या माळा, इलेक्ट्रिक साहित्य, रंगीबेरंगी कागद, तयार मखर, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी दुकानांमध्ये गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बनविण्याची लगबग चार महिन्यांपासून सुरू आहे. कारागीर मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे कारागिरांनी सांगितले.
फोटो : ०५ केआरडी ०१
कॅप्शन : कऱ्हाडातील मूर्तिकार गणेशमूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवत आहेत.