सातारा : नातवाला पोहायला शिकविण्यासाठी घेऊन गेलेल्या आजोबांचा येथील फुटक्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.सुधीर गोपालकृष्ण उनकुले (वय ५४, रा. शनिवार पेठ, सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे. सुधीर उनकुले हे मंगळवारी सकाळी साठेआठच्या सुमारास फुटका तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि नातू होता. वास्तविक, नातवाला पोहण्यास शिकविण्यासाठी ते गेले होते. मात्र, सुमारे तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज पहिल्यादांच ते पोहायला तलावात उतरणार होते. त्यामुळे त्यांनी सुरूवातीला तलावातून पोहत फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. त्यांचा नातू व मुलगा तलावाच्या पायरीवर बसले होते. आजोबा सुधीर उनकुले पोहत तलावाच्या दुसऱ्या बाजूला गेले, परंतु परत येत असताना त्यांना दम लागला आणि ते क्षणात बुडाले.सध्या उन्हाळी सुटी असल्यामुळे तलावात पोहण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे आजोबा तलावात बुडाल्याचे कोणालाच लवकर दिसले नाहीत. ‘इथे पोहणारी व्यक्ती कुठे गेली,’ असे एका व्यक्तीने तेथे पोहत असणाऱ्या दुसऱ्या लोकांना विचारले. गर्दीमध्ये उनकुले यांना शोधण्याचा प्रयत्न झाला; परंतु ते दिसले नाहीत. त्यामुळे आजोबा बुडाले असावेत, असे समजून काही नागरिकांनी त्यांचा शोध सुरू केला. सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तब्बल पंधरा मिनिटांनंतर तलावाच्या तळातून त्यांना बाहेर काढण्यात आले. जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात त्यांना तत्काळ नेण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (प्रतिनिधी)
फुटक्या तलावात बुडून आजोबांचा मृत्यू
By admin | Updated: April 22, 2015 00:22 IST