किडगाव : जम्मू येथे सैन्यदलात कवायत करीत असताना सातारा तालुक्यातील कामथी येथील जवान लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय ३४) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही वार्ता समजताच गावात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव गावी आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जवान लक्ष्मण चव्हाण हे २००४ मध्ये भोपाळ येथून सैन्यात दाखल झाले. त्यांनी आजवर अमृतसर, श्रीनगर, हैदराबाद आणि जम्मू येथे कर्तव्य बजावले. ते १६२ ईएमई फिल्ड वर्कशॉप नाईक पदावर कार्यरत होते. ही घटना बुधवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. लक्ष्मण चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण कामथी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर उच्च शिक्षण सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाले. २००६ मध्ये त्यांचा विवाह झाला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कामथी गावावर शोककळा पसरली. (वार्ताहर)गावचा मार्गदर्शक गमावलाचव्हाण हे कामथीतील शिवसह्याद्री मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत होते. गावी आल्यावर तरुणांना ते मार्गदर्शन करीत होते. ते गेल्या महिन्यात सुटीवर आले होते. या काळात गोंधळाचा धार्मिक विधी उरकून ते दि. १० जूनला पुन्हा जम्मूला गेले होते.
कामथीतील जवानाचा कवायतीदरम्यान मृत्यू
By admin | Updated: July 8, 2016 00:56 IST