कऱ्हाड : घारेवाडी ते तांबवे या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक वृक्ष वाढले आहेत. या वृक्षांच्या फांद्यामुळे मोठ्या वाहनांचे नुकसान होत आहे. या मार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. मालवाहतूक वाहनांचीही ये-जा असते. मोठ्या वाहनांच्या काचांना वृक्षांच्या फांद्या थटून काचा फुटत आहेत. या धोकादायक फांद्या तसेच वृक्ष हटविण्याची मागणी होत आहे.
गटरमुळे दुर्गंधी
कऱ्हाड : शहरातील मंडई परिसरात असलेली गटारे सातत्याने तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. भाजीपाला विक्रेते शिल्लक राहिलेला भाजीपाला, तसेच कचरा गटारांमध्ये टाकत असल्याने तो कुजून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पालिकेने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नागरिकांची गैरसोय
कऱ्हाड : सैदापूर, कृष्णा कॅनॉल चौक परिसरात नागरिकांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होत आहे. कृष्णा कॅनॉल परिसरात व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, या ठिकाणी ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहाची सोय करावी, अशी मागणी नागरिक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.
स्वच्छतेची मागणी
मलकापूर : आगाशिवनगर येथील शिवपर्वत कॉलनीत स्वच्छता करण्याची गरज आहे. कॉलनीमध्ये सर्वत्र कचरा पसरला आहे. झाडी वाढली आहे. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच कॉलनीमध्ये एकही गटर नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे.