कार्वे : कार्वे, ता. कऱ्हाड परिसरात गत काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके होरपळत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जुलै महिन्यात विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. अतिवृष्टीमध्ये शेतात साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होऊन सध्या शिवार कोरडे पडले आहे. त्यातच जुलै महिन्यातील अतिवृष्टीत अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र, बिघाड दुरुस्त केल्यानंतर पुन्हा होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. काही ठिकाणी पावसामुळे विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. या परिस्थितीमुळे शिवारात अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. परिणामी, सध्या खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, ऊस ही पिके पाण्याअभावी होरपळत आहेत. या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र, गरज असतानाच पावसाने दडी मारली असून यंदा खरिपातील उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. या हंगामात उत्पादन घटले तर पुढील हंगामापर्यंत शेतकऱ्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. सध्या खताचे दर वाढले आहेत. त्याबरोबरच शेती उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच निसर्गाने शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी शेतीसह पिके वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या. या सर्व परिस्थितीतून शेतकरी सावरत असताना पावसाने पाठ फिरवल्यामुळे सध्या पिके पाण्याअभावी होरपळत असून शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.