सातारा : डोळेगाव, ता. सातारा येथील विकास सोसायटीच्या मतदार यादीत बोगस मतदारांची नोंद केल्याप्रकरणी अॅड. विक्रम पवार आणि सोमनाथ गोडसे यांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सचिव लहूराज जयसिंग चव्हाण (वय ३९, रा. वेचले, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, डोळेगाव सोसायटी निवडणूक कालावधीतच गुन्हा नोंद झाल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, डोळेगाव विकास सेवा सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अॅड. विक्रम लालासाहेब पवार (रा. मांडवे) आणि सोमनाथ हरिबा गोडसे (रा. डोळेगाव) यांनी सातारा येथील सहायक निबंधक कार्यालयात जावून डोळेगाव विकास सेवा सोसायटीच्या मतदारांची यादी घेतली आणि त्यामध्ये मतदारसंख्या वाढविली. मात्र, ही यादी वाढवत असताना त्यांनी बोगस मतदारांची नोंदणी केली. दरम्यान, याची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी त्या अनुषंगाने निवेदनही काढले होते. मात्र सोसायटीचे सचिव चव्हाण यांनी याप्रकरणी तक्रार दिली. (प्रतिनिधी)
वकिलासह दोघांवर गुन्हा
By admin | Updated: December 14, 2014 00:47 IST